दिल्लीसह NCRमधील काही भागात धुळीचे वादळ, पावसाच्या सरी; मेट्रो सेवा कोलमडली, विमाने वळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:52 IST2025-04-11T22:51:22+5:302025-04-11T22:52:09+5:30
Delhi Dust Strom Rain News Updates: पुढील काही तास दिल्लीत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्लीसह NCRमधील काही भागात धुळीचे वादळ, पावसाच्या सरी; मेट्रो सेवा कोलमडली, विमाने वळवली
Delhi Dust Strom Rain News Updates: शुक्रवारी सायंकाळी अचानक दिल्लीतील वातावरण एकदम बदलून गेले. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वर जात असतानाच अचानक दिल्ली आणि लगतच्या परिसरात सुरुवातीला धुळीचे वादळ घोंगावले आणि त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे सायंकाळी घरी परतत असलेल्या चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली.
धुळीचे वादळ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत येणारी अनेक विमाने अन्य मार्गांवर वळवण्यात आली. रात्री ९ वाजेपर्यंत दिल्लीला येणारी सुमारे १५ विमाने वळवण्यात आली होती. अचानक आलेले धुळीच्या वादळाचा फटका दिल्लीतील मेट्रो सेवेलाही बसला. दिल्लीतील मेट्रेसेवा कोलमडली. पूर्व दिल्लीतील मधु विहार पोलीस स्टेशन परिसरात जोरदार वादळामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. हवामान खात्याने पुढील काही तासांत दिल्ली आणि परिसरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता
वादळाचा दिल्ली मेट्रो सेवांवरही परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागात मेट्रोचा वेग कमी करण्यात आला. यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. वेग मर्यादेमुळे मेट्रो येण्यास विलंब होत होता. याचाही फटका प्रवाशांना बसला. पुढील तीन तासांत दिल्ली, एनसीआर, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागात विजांसह वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. हवामान विभागाने लोकांना या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे मंडी हाऊस आणि दिल्ली गेटसह काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. एक झाड दुचाकीवर पडल्याने नुकसान झाले. झाडे कोसळल्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती.