डॉक्टरांनी केला चमत्कार, १० वर्षांपासून बोलू शकत नव्हता मुलगा; सर्जरीनंतर परत मिळाला 'आवाज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 20:30 IST2022-06-04T20:28:39+5:302022-06-04T20:30:42+5:30
दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पीटलमधलं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे की जे एक चमत्कार म्हणून पाहिलं जात आहे. या हॉस्पीटलमध्ये एका मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली की जो गेल्या १० वर्षांपासून अधिक काळ ट्रॅकोस्टोपी ट्यूबद्वारे श्वास घेत होता.

डॉक्टरांनी केला चमत्कार, १० वर्षांपासून बोलू शकत नव्हता मुलगा; सर्जरीनंतर परत मिळाला 'आवाज'
नवी दिल्ली-
दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पीटलमधलं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे की जे एक चमत्कार म्हणून पाहिलं जात आहे. या हॉस्पीटलमध्ये एका मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली की जो गेल्या १० वर्षांपासून अधिक काळ ट्रॅकोस्टोपी ट्यूबद्वारे श्वास घेत होता. लहानपणी डोक्याला दुखापत झाल्यामुळे श्रीकांत बराच काळ व्हेंटिलेटरवर होता, त्यामुळे तो बोलू शकत नव्हता आणि प्रतिक्रियाही देऊ शकत नव्हता. दुखापतीमुळे श्रीकांतची श्वासोच्छवासाची नळीही काम करत नव्हती, त्यामुळे ट्रॅकोस्टोमी ट्यूबद्वारे श्वास घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
विंडपाइपचा काही भाग नसल्यामुळे श्रीकांतला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. श्वास घेण्यासाठी कोणतीच जागा नसल्यानं त्याचा आवाज येत नव्हता. मात्र १० वर्षांनंतर या मुलावर सर गंगाराम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्वासनलिका आणि आवाज पुनर्संचयित करण्याच्या शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी श्रीकांतला त्याचा श्वास आणि आवाज दोन्ही परत केले आहेत. श्रीकांत आता पूर्णपणे निरोगी आहे.
तज्ज्ञ म्हणाले 15 वर्षात अशी केस पाहिली नाही
यशस्वी ऑपरेशननंतर ईएनटी विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणाले की, माझ्या 15 वर्षांच्या कार्यकाळात मी अशी केस पाहिली नाही. जेव्हा मी रुग्णाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटले की ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल. मुलाच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलने थोरॅसिक सर्जरी, ईएनटी, पेडियाट्रिक इंटेसिव्ह केअर आणि ऍनेस्थेशिया या विभागातील डॉक्टरांचे एक विशेष पॅनेल तयार केले होते.
शस्त्रक्रियेपूर्वी पालकांची परवानगी
"रुग्णाची श्वासनलिका आणि विंड पाइप पूर्णपणे बंद झाला होता, त्यामुळे शस्त्रक्रिया करणे खूप अवघड होते, परंतु आमच्याकडे शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मुलाच्या पालकांना ऑपरेशनमध्ये खूप धोका असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मुलाचे ऑपरेशन सहा तास चालले", असं ऑपरेशनबाबत सर गंगाराम हॉस्पिटलचे ईएनटी डॉ. मनीष मुंजाळ म्हणाले.