७०० तरुणींसोबत मैत्री, प्रायव्हेट फोटो आणि..., परदेशी मॉडेल बनून फसवणारा तरुण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:46 IST2025-01-04T12:45:15+5:302025-01-04T12:46:16+5:30
Delhi Crime News: जवळपास ७०० हून अधिक तरुणींशी मैत्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत तरुणाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

७०० तरुणींसोबत मैत्री, प्रायव्हेट फोटो आणि..., परदेशी मॉडेल बनून फसवणारा तरुण अटकेत
जवळपास ७०० हून अधिक तरुणींशी मैत्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत तरुणाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण ऑनलाइन मैत्री करुन तरुणी आणि महिलांना ब्लॅकमेल करायचा तसेच त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने एक व्हर्च्युअल मोबाइल नंबर मिळवला होता. त्याचा वापर करून त्याने बंबल, स्नॅपचॅट आणि इतर अॅपवर एक फेक प्रोफाइल तयार केली होती. तसेच तो स्वत:ची ओळख अमेरिकेत राहणारा फ्रीलान्स मॉडेल म्हणून करून देत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ब्लॅकमेलरच्या टार्गेटवर १८ ते ३० वयाच्या तरुणी आणि महिला होत्या. तरुणी आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी आरोपीने आपल्या प्रोफाइलवर ब्राझीलच्या एका मॉडेलचा फोटो लावला होता.
ज्या महिलांशी बोलणं व्हायचं त्यांना तो आपण एका प्रोजेक्टसाठी भारतात आलोय, असं सांगायचा. त्यानंतर तो त्या महिला किंवा मुलींशी मैत्री करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. तसेच जवळीक निर्माण झाल्यावर त्यांच्याकडून त्यांचे प्रायव्हेट फोटो मागून घ्यायचा. एखादी तरुणी किंवा महिला या तरुणाच्या जाळ्यात सापडली की, आरोपी ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे वसूल करण्यासा सुरुवात करायचा.
या प्रकरणी १३ डिसेंबर २०२४ रोजी पश्चिम जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यातील पोलिसांना एक तक्रार मिळाली होती. तक्रार करणारी तरुणी दिल्ली विद्यापीठातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिने तक्रारीत सांगितले होते की, मी ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीला भेटले होते. त्यानी आपण यूएसमधील फ्रीलान्स मॉडेल असल्याचे सांगितले होते. चॅटिंगच्या माध्यमातून ओळख वाढल्यावर मी त्याला माझे काही प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ पाठवले. मी त्याला भेटायला बोलावले होते. मात्र त्याने नकार दिला. मात्र एके दिवशी माझ्या मोबाईलवर माझेच काही आक्षेपार्ह व्हिडीओ आले. तसेच हे व्हिडीओ पाठवणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून माझ्यासोबत चॅटिंग करणारा तरुणच असल्याचे समजल्यावर मला धक्का बसला, असे या तरुणीने सांगितले.
त्यानंतर पैसे न दिल्यास हे व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी आरोपीने पीडित तरुणीला दिली. त्यामुळे घाबरून या तरुणीने शक्य होईल, तेवढे पैसे आरोपीला दिले. मात्र तो आणखी पैसे मागू लागला. अखेरीस या प्रकाराची कल्पना या तरुणीने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.