Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्यामुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज(दि.२०) जनसुनावणीदरम्यान हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यातील आरोपी गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असून, त्याचा एक फोटोही समोर आला आहे. राजेश भाई खिमजी भाई सकारिया(वय ४१) असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करुन त्याची चौकशी सुरू केली आहे.
'मुलगा कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही' रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी राजेश भाई खिमजी भाई सकारिया याच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. राजेश कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याचे त्याच्या आईचे म्हणने आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीचा एक नातेवाईक तुरुंगात आहे. त्याने त्याची सुटका करण्यासाठी अर्ज आणला होता. कागदपत्रे दिल्यानंतर त्या व्यक्तीने अचानक मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. सध्या आरोपीची अधिक चौकशी केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी चापट मारल्याचा दावा केला घटनेतील प्रत्यक्षदर्शी अंजली म्हणाल्या की, मी तिथे उपस्थित होते. आरोपी मुख्यमंत्र्यांशी बोलत होता, यावेळी त्याने चापट मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताबडतोब पकडून घेऊन गेली. मात्र, दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी मुख्यमंत्र्यांना चापट मारल्याच्या दाव्याचे खंडन केले. ते म्हणाले की, आरोपीने मुख्यमंत्र्यांचा हात धरून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचे डोके टेबलाच्या कोपऱ्यावर आदळले. सध्या गुप्ता यांची प्रकृती स्थिर आहे. पण, या घटनेमुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे.
काँग्रेस-आप नेत्यांनी हल्ल्याचा निषेध केलादिल्ली काँग्रेसचे प्रमुख देवेंद्र यादव म्हणाले, ही घटना खूप दुर्दैवी आहे. जर दिल्लीच्या मुख्यमंत्री सुरक्षित नसतील, तर सामान्य महिला कशा सुरक्षित राहतील. तर, माजी मुख्यमंत्री आणि आप आमदार आतिशी यांनीही हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की, लोकशाहीमध्ये मतभेद आणि निषेधाला जागा असते, परंतु हिंसाचाराला जागा नाही. त्यांनी आशा व्यक्त केली की, पोलिस आरोपींवर कठोर कारवाई करतील.