दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये कधी मिळणार? रेखा गुप्ता यांनी सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:23 IST2025-02-20T12:52:01+5:302025-02-20T13:23:15+5:30
भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व महिलांना दरमहा आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये कधी मिळणार? रेखा गुप्ता यांनी सांगितली तारीख
नवी दिल्ली : रेखा गुप्ता यांनी गुरुवारी (दि.२०) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांनी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून रेखा गुप्ता आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी काल झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती.
भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व महिलांना दरमहा आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याबद्दल रेखा गुप्ता यांनी शपथविधीपूर्वी स्पष्टपणे सांगितले की, भाजप आपले आश्वासन पूर्ण करेल. भाजप सरकार महिलांना दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे आपले आश्वासन पूर्ण करणार आहे. आर्थिक मदतीचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात ८ मार्चपर्यंत जमा होईल.
रेखा गुप्ता म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी दिल्लीतील सर्व ४८ भाजप आमदारांची आहे. महिलांसाठी आर्थिक मदतीसह आमची सर्व आश्वासने आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. ८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे निश्चितपणे हस्तांतरित केले जातील."
दरम्यान, दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप सरकार महिलांना आर्थिक मदत करून आपले निवडणुकीत आश्वासन पूर्ण करण्याचा विचार करत आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाले. यात भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या.
भाजपने कोणती आश्वासने दिली?
आपने विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी दरमहा २,१०० रुपये मदत करण्याचे जाहीर केले होते. तर, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दरमहा २५०० रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, गेल्या बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांनी सांगितले की, दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही भाजपची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे.