“काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने काहीही फरक पडत नाही”; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:07 IST2023-10-06T16:05:45+5:302023-10-06T16:07:44+5:30
Arvind Kejriwal: संपूर्ण दारू घोटाळा खोटा असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडे एकही पुरावा नाही, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

“काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने काहीही फरक पडत नाही”; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर संजय सिंह यांची ५ दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाकडून भाजपवर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, इंडिया आघाडीचा एक घट असलेल्या आम आदमी पक्षाला काँग्रेसकडून समर्थन मिळत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे समर्थन मिळाल्याने काहीही फरक पडत नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
मीडियाशी बोलताना, मुख्यमंत्री केजरीवाल यांना काँग्रेसकडून खुलेपणाने पाठिंबा मिळत नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. संजय सिंह यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांची चौकशी करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे. केंद्र सरकार केवळ आरोप करते आणि तपास करते, पण काहीही सापडत नाही, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
खोट्या केसेस लादल्याने देशाची प्रगती होणार नाही
केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक गुन्हे नोंदवले, पण त्यांच्या चौकशीनंतर काहीही निष्पन्न झाले नाही. सर्व प्रकरणे खोटी आहेत. वेळेचा अपव्यय सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय ज्या प्रकारे मनिष सिसोदिया प्रकरणाबाबत प्रश्न विचारले होते, त्यावरून ते प्रकरण खोटे असल्याचे दिसून येते. खोट्या प्रकरणांच्या तपासात सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांसह सर्वांचा वेळ वाया जातो. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. कोणावरही खोट्या केसेस लादल्याने देशाची प्रगती होणार नाही, या शब्दांत केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, शालेय वर्गखोल्यांची व्यवस्था, वीज, रस्ते, पाणी या सर्वांमध्ये घोटाळा झाल्याचा दावा केला जातो. सर्व प्रकारचे तपास करून झाले, पण त्यात काही सापडले नाही. आता हा संपूर्ण दारू घोटाळा खोटा असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडे एकही पुरावा नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला.