दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:32 IST2025-11-13T10:54:04+5:302025-11-13T11:32:12+5:30
दिल्ली स्फोट प्रकरणातील डॉक्टर उमर नबी स्फोटाच्या काही वेळ आधी तिथल्या एका मिशिदीत गेला होता.

दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोट घडवून आणणारा मुख्य दहशतवादी डॉक्टर उमर नबी याचा चेहरा अखेर उघड झाला आहे. स्फोट होण्यापूर्वी काही तास आधी जुन्या दिल्लीतील एका मशिदीजवळ तो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तपास यंत्रणांसाठी हे फुटेज अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २४ हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. फरिदाबादमध्ये डॉक्टरांचे दहशतवादी मॉड्यूल समोर आल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने उमर नबीने दिल्लीत स्फोट घडवून आणला.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोटाच्या दिवशी (सोमवार) डॉक्टर उमर नबी हा लाल किल्ल्याजवळ तुर्कमान गेट भागात असलेल्या फैज-ए-इलाही मशिदीत गेला होता. रामलीला मैदानासमोर, तुर्कमान गेटच्या अगदी जवळ असलेल्या या मशिदीत त्याने सुमारे दहा मिनिटे घालवली. त्यानंतर तो बाहेर आला आणि रस्त्यावर फिरताना दिसला.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, उमर नबी शर्ट आणि जीन्स रस्त्यावर इकडे-तिकडे पाहत चालत होता. बाहेर अंधार झाल्यामुळे, त्याने नमाज अदा करण्यासाठी मशिदीत प्रवेश केला असावा, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. पोलिस आता त्याने मशिदीत काय केले, याची कसून चौकशी करत आहेत. काही वृत्तांनुसार, उमर दुपारी २.३० वाजता मशिदीजवळ होता. तर, काही फुटेज स्फोट होण्यापूर्वी अंधार पडल्यानंतरचे आहे.
VIDEO | Delhi terror incident: CCTV visuals show suspect Dr Umar Nabi, who was driving the explosives-laden car, leaving the mosque near Turkman Gate before the blast on Monday evening.
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2025
(Source: Third Party)#Delhiattack
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/oY8hDwfZSC
मशिदीतून बाहेर पडल्यानंतर त्याने आपली स्फोटकांनी भरलेली ह्यूंडई आय २० कार घेतली आणि लाल किल्ल्याच्या दिशेने गेला. लाल किल्ल्याच्या स्फोटस्थळापासून तुर्कमान गेट मशिदीमधील अंतर सुमारे २ किलोमीटर आहे. सकाळी ७ वाजता फरीदाबादमधून निघालेला उमर तब्बल १२ तास शहरात फिरत होता, आणि स्फोट होण्यापूर्वी तो कनॉट प्लेस भागातही गेला होता.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, स्फोट घडवण्याच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद संबंधित फरीदाबाद टेरर मॉड्यूलमधील त्याचे साथीदार अटक झाले होते. यामुळे घाबरून आणि पोलिसांचा दबाव वाढल्याने, उमरने ठरलेल्या वेळेपूर्वीच घाईघाईत शहराच्या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणला. या स्फोटात १२ लोकांचा बळी गेला.
DNA चाचणीतून ओळख पटली
स्फोटामुळे उमरचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. मात्र, डीएनए चाचणीतून कारमधील मृतदेह उमरचा असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. उमर नबीच स्फोटावेळी i20 कार चालवत होता.