३२ कारमधून चार शहरांमध्ये स्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा होता कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:50 IST2025-11-14T06:49:55+5:302025-11-14T06:50:18+5:30
Delhi Blast Update: केवळ एकच नव्हे तर ३२ विविध कारचा वापर करून देशांतील चार शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा व्यापक कट असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 'ह्युंडई आय २०' व 'फोर्ड इकोस्पोर्ट' या दोन कारमध्ये काही सुधारणा केल्या होत्या.

३२ कारमधून चार शहरांमध्ये स्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा होता कट
नवी दिल्ली - केवळ एकच नव्हे तर ३२ विविध कारचा वापर करून देशांतील चार शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा व्यापक कट असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 'ह्युंडई आय २०' व 'फोर्ड इकोस्पोर्ट' या दोन कारमध्ये काही सुधारणा केल्या होत्या. तसेच हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आठ जणांची टीम केली होती.
कार चालवणारा उमर नबीच
दिल्ली स्फोटात वापरलेली कार डॉ. उमर नबी हाच चालवत होता. स्फोटाच्या ठिकाणाहून एकत्र केलेल्या शरीराच्या अवशेषांतून मिळवलेले डीएनए त्याच्या आईच्या डीएनएशी जुळले आहेत. याशिवाय स्फोटांपूर्वीचे एक सीसीटीव्ही फुटेजही तपास यंत्रणांच्या हाती असून उमर नबी स्फोटापूर्वी काही तास रामलीला मैदानाजवळ दिसला होता. स्फोट झालेल्या परिसरातील एका दुकानाच्या छतावर गुरुवारी सकाळी एक तुटलेला मानवी हात सापडला.
तिसरी कारही जप्त
दिल्ली स्फोटाशी संबंधित तिसरी कारही जप्त करण्यात आली असून ती डॉ. शाहीन सईदच्या नावावर आहे. अल-फलाह विद्यापीठातील एका कॉलेजच्या परिसरात उभी होती. स्फोटांपूर्वी रेकी करण्यासाठी या कारचा वापर केल्याचा संशय आहे. या विद्यापीठाच्या परिसरातील ३०हून अधिक कारची चौकशी करण्यात आली असून मेडिकल कॉलेजसह हॉस्टेलच्या परिसरात उभ्या कारच्याही नोंदणी व मालकीविषयी माहिती घेतली जात आहे. यापैकी कारचा वापर स्फोटकांची वाहतूक करण्यासाठी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
स्फोटकांसाठी जमवला २६ लाखांचा निधी
‘व्हाइट-कॉलर टेरर मॉड्युल’शी संबंधित डॉ. मुजम्मिल गनई, डॉ. अदील अहमद राथर, डॉ. शाहीन सईद व डॉ. उमर नबी या चौघांनी स्फोटक साहित्य खरेदी करण्यासाठी २६ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा निधी गोळा केल्याची बाब तपासात उघड झाली. ही रक्कम सुरक्षित ठेवण्याची व कटात वापरण्याची जबाबदारी डॉ. उमरकडे दिली होती. या रकमेतील तीन लाख रुपयातून २६ क्विंटल एनपीके खत गुरुग्राम, नूंह व अन्य शहरांमधून खरेदी केले गेले. हे खत आयईडी म्हणून वापरले गेले.