दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:04 IST2025-11-13T06:59:54+5:302025-11-13T07:04:04+5:30
Delhi Blast Update: व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलच्या संबंधात अलीकडेच अटक करण्यात आलेल्या डॉ. मुजम्मिल गनीच्या मोबाइल फोन डेटाच्या विश्लेषणातून त्याने यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसरात अनेकवेळा रेकी केली होती, असे समोर आले आहे.

दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
नवी दिल्ली - व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलच्या संबंधात अलीकडेच अटक करण्यात आलेल्या डॉ. मुजम्मिल गनीच्या मोबाइल फोन डेटाच्या विश्लेषणातून त्याने यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसरात अनेकवेळा रेकी केली होती, असे समोर आले आहे. ही रेकी २६ जानेवारी रोजी ऐतिहासिक स्मारकाला लक्ष्य करण्याच्या मोठ्या कटाचा भाग होती. सोमवारी परिसरात सखोल गस्त घालण्यात आल्यामुळे कट उधळला गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केल्यानंतर आणि तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक केल्यानंतर काही तासांतच, दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. यामध्ये १३ जण ठार झाले आणि अनेकजण जखमी झाले.
जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या या दहशतवादी मॉड्युलचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सुमारे २,५०० किलोग्राम अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट व सल्फर जप्त केले.
स्फोटाच्या ठिकाणाहून ४० नमुने गोळा करण्यात आले आहेत. प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून येते की, स्फोटकांपैकी एक अमोनियम नायट्रेट असल्याचे दिसून येते, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने म्हटले आहे.
मागील जानेवारीत तो लाल किल्ला परिसरात वारंवार का गेला?
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, डॉ. मुजम्मिलच्या मोबाइल फोनवरून मिळालेल्या ‘डंप डेटा’च्या विश्लेषणातून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो लाल किल्ला परिसरात आणि आसपास वारंवार गेला असल्याचे दिसून आले. डॉ. मुजम्मिलने त्याचा साथीदार डॉ. उमर नबी याच्यासह सुरक्षा व्यवस्था व गर्दीच्या प्रवृत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी अनेकवेळा लाल किल्ल्याला भेट दिली. टॉवर लोकेशन डेटा आणि आजूबाजूच्या भागातून गोळा केलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे दोघांच्या हालचालींची पुष्टी करण्यात आली. या भेटी २६ जानेवारी रोजी नियोजित हल्ल्यापूर्वीच्या सविस्तर तपासणीचा भाग होत्या.
दिल्लीत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम, कसून तपासणी
स्फोटानंतर दिल्ली पोलिस राष्ट्रीय राजधानीत मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवत आहेत. दिल्लीच्या सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांवर निमलष्करी दलांसह पोलिस कर्मचारी तैनात आहेत. कडक सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून, शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
गाझीपूर, सिंघू, टिकरी आणि बदरपूरसह आंतरराज्यीय सीमांवर वरिष्ठ पोलिस अधिकारी वैयक्तिकरीत्या सुरक्षा तपासणीवर लक्ष ठेवून आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल नजरेआड होऊ नये, यासाठी बाजारपेठा, मेट्रो स्टेशन, रेल्वे टर्मिनल तसेच मॉल, धार्मिक स्थळांजव आणि बस स्टँडवर वाहनांची तपासणी केली जात आहे.
स्फोटाबद्दल इराणनेही केला शोक व्यक्त
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाबद्दल इराणने शोक व्यक्त केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाकेई यांनी शोकसंदेश पाठवला आहे. या घटनेतील जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. जगभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
हरयाणातून मौलवी ताब्यात : घरातून २,५०० स्फोटके जप्त
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवादी मॉड्यूलच्या कारवायांच्या चौकशीचा भाग म्हणून हरियाणातील मेवात येथील एका मौलवीला बुधवारी ताब्यात घेतले. मौलवी इश्तियाकला श्रीनगर येथे नेण्यात आले आहे.
तो फरिदाबादमधील अल् फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या घरातून २,५०० किलोहून अधिक अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर जप्त केले. अटक केलेला मौलवी इश्तियाक ही नववी व्यक्ती असेल.
स्निफर डॉग आणि दंगलविरोधी पथके तैनात
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व जिल्हा युनिट्स आणि विशेष शाखांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आम्ही कोणताही धोका पत्करत नाही.
आमचे लक्ष जनतेचा विश्वास राखण्यावर आणि शहर सुरक्षित राहण्यावर आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. संवेदनशील भागात स्निफर डॉग, मेटल डिटेक्टर आणि दंगलविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.
कार खरेदी-विक्रीचे तपशील मागविले
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने फरिदाबाद येथील एका कार विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये वापरलेल्या कार खरेदी-विक्री करणाऱ्यांना अलीकडेच विकल्या गेलेल्या वाहनांची पडताळणी करून तपशील शेअर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.