पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 08:18 IST2025-11-11T08:18:10+5:302025-11-11T08:18:53+5:30
दिल्लीत झालेल्या स्फोटात फरार असलेल्या डॉक्टरचा उमरचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
Delhi Blast: राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या कार स्फोटाच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामागे मोठा कट उघडकीस येत आहे. फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य अटक झाल्यामुळे घाबरलेल्या डॉक्टर उमर मोहम्मदनेच हा स्फोट घडवला, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आपले दहशतवादी नेटवर्क उघड होईल या भीतीने डॉक्टर उमरने आत्मघाती पद्धतीने स्फोटकांनी भरलेली ह्युंदाई आय-२० कार स्फोट करून उडवून दिली.
मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सोमवारीस्फोटकांनी भरलेली ह्युंदाई आय-२० कार जाणीवपूर्वक उडवून देण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणांनी या घटनेला संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले असून, या भीषण स्फोटात किमान आठ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला एका आत्मघाती ऑपरेशनसारखा असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलने या बॉम्बस्फोटाचा कट रचला असावा आणि याचा सदस्य डॉक्टर उमर मोहम्मद स्फोटावेळी आय-२० कारमध्ये उपस्थित असल्याचा दाट संशय आहे.
'डॉक्टर उमर'नेच केला आत्मघाती हल्ला?
स्फोटानंतर कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. हा मृतदेह डॉक्टर उमर मोहम्मदचा आहे का, हे निश्चित करण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. डॉक्टर उमर मोहम्मद हा अनेक महिन्यांपासून फरार होता आणि उत्तर भारतात कार्यरत असलेल्या दहशतवादी फंडिंग आणि शस्त्र तस्करी नेटवर्कशी जोडलेला होता.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अवघ्या काही दिवसांपूर्वी या नेटवर्कमधील डॉ. मुझम्मिल शकिल याला अटक झाली होती आणि त्याच्याकडून तब्बल २,९०० किलो स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली होती. शकिलच्या अटकेनंतर आपले नेटवर्क उघड होईल या भीतीने डॉक्टर उमरने घाबरून जाऊन हा लाल किल्ल्याजवळील स्फोट घडवला असावा, असा प्रमुख संशय आता व्यक्त होत आहे. स्फोट झालेल्या आय-२० कारच्या मालकी मोहम्मद सलमानकडे होती. त्याने ती कार आधी तारिक या कार डिलकरकडे दिली आणि अखेरीस ती डॉक्टर उमर मोहम्मदपर्यंत पोहोचली. पुलवामा हल्ल्याच्या दिवशीच या कारची विक्री झाली होती. या कारचा मार्ग उघड झाला असून ही कार दिल्ली, हरियाणा, बदरपूर सीमेवर दिल्लीत आली होती. नंतर ही गाडी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ दिसली.
स्फोटावेळी दहशतवादी उमर मोहम्मद कारमध्ये होता. त्याने इतर दोन सहकाऱ्यांसह हल्ल्याची योजना आखली होती. फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक सत्र सुरु असतानाच तो घाबरला आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखली. त्याने त्याच्या साथीदारांसह कारमध्ये डेटोनेटर बसवून स्फोट घडवून आणला. त्याआधी जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि फरिदाबाद पोलीस एका डॉक्टरचा शोध घेत होते.
प्राथमिक अहवालानुसार, गर्दीच्या ठिकाणी आणण्यापूर्वीच कारमध्ये विस्फोटक सामग्री भरली गेली होती. सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी हा स्फोट झाला. एनएसजी आणि फॉरेन्सिक टीम्सनी घटनास्थळावरून नमुने गोळा केले असून, स्फोटात वापरलेल्या रसायनांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी २,९०० किलोग्रामहून अधिक अमोनियम नायट्रेट जप्त केल्याच्या काही तासांनंतरच ही घटना घडली आहे. जप्त केलेल्या सामग्रीतून शेकडो शक्तिशाली आयईडी बनवून दिल्लीत मोठे दहशतवादी हल्ले करण्याची या मॉड्यूलची योजना होती.