दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 04:24 IST2025-11-11T04:23:25+5:302025-11-11T04:24:19+5:30
Delhi blast Update: लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून, त्यात आय २० कारमध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फोट करण्यात आला, असा गुप्तचर संस्थांना संशय आहे.

दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
राजधानी दिल्लीत झालेल्या आणि संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या स्फोटाप्रकरणी सुरू असलेल्या तपासामधून आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून, त्यात आय २० कारमध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फोट करण्यात आला, असा गुप्तचर संस्थांना संशय आहे. लाल किल्ल्याजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० जण जखमी झाले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या कार स्फोट प्रकरणी यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय स्फोटक पदार्थ अधियम कलम ३ आणि ४ सुद्धा जोडण्यात आले आहे.
दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. त्यामधून हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असण्याचे संकेत मिळत आहेत. ही कार गुरुग्राम उत्तर आरटीओमध्ये नोंदणी केलेली होती. तिचा क्रमांक एचआर २६, ७६२४ होता. ही कार मोहम्मद सलमान याच्या नावावर होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. या चौकशीत सलमान याने ही कार जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील तारिक नावाच्या एका व्यक्तीला विकल्याचे सांगितले आहे. दरम्यान, यात कारवर १५ सप्टेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, तारिक याला जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एवढंच नाही तर आतापर्यंतच्या तपासामधून लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटाचे धागेदोरे हे ९ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आलेल्या फरिदाबाद टेरर मॉड्युलशी जुळत असल्याचे संकेत मिळत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले आहेत. दरम्यान, ज्या आय२० कारमध्ये स्फोट झाला, त्या कारमध्ये दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद होता, असा गुप्तचर संस्थांचा संशय आहे. फरिदाबाब टेकर मॉ़ड्युलमधील प्रमुख सदस्य अशलेला उमर मोहम्मद हा फरार होता. आता पोलिसांनी कारमधील मृतांची डीएनए चाचणी करणार असून, त्यामधून या कारमध्ये उमर मोहम्मद होती की नाही हे स्पष्ट होणार आहे. कामध्ये आणखी तिघे संशयित होते, अशीही माहिती मिळत आहे. तसेच त्यांचीही ओळख पटवण्याचे प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहेत.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोट झालेल्या परिसरामधील आजूबाजूच्या ठिकाणी सीसीटीव्ही तपासले असता संबंधित आय२० कारबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कार १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी लाल किल्ल्याजवळच्या मुघलकालीन सुनहरी मशीद येथील पार्किंगमध्ये आली. त्यानंतर सुमारे तीन तास तिथेच थांबली. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी निघाली आणि ४ मिनिटांतच स्फोट झाला. दरम्यान, ही कार थांबलेली असताना तिच्यात स्फोटके लावण्यात आली असावीत असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.