Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:10 IST2025-11-13T17:08:11+5:302025-11-13T17:10:40+5:30

Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या तपासात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे.

Delhi Blast Probe: Fourth Suspect Car, Maruti Brezza, Seized from Al-Falah University Parking | Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या तपासात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यातील दहशतवादी नेटवर्कशी जोडलेली चौथी संशयित कार फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, स्फोटाच्या दिवशी मुख्य आरोपी डॉ. उमर नबी याच्या हालचाली दर्शवणारे नवे सीसीटीव्ही फुटेजही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे.

फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये सिल्वर रंगाची मारुती ब्रेझा उभी असल्याचे आढळून आले आहे. दहशतवाद विरोधी पथक, राष्ट्रीय तपास यंत्रणा, बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेन्सिक पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत आणि वाहनाची कसून चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, ही ब्रेझा कार सोमवारी स्फोटात वापरल्या गेलेल्या आय२० कारचा मुख्य आरोपी डॉ. उमर नबी याच्या नेटवर्कशी जोडलेली आहे. ही कार डॉ. शाहीन यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. यापूर्वी, डॉ. शाहीन यांची दुसरी कार (मारुती स्विफ्ट) जप्त करण्यात आली होती, ज्यात पोलिसांना असॉल्ट रायफल सापडली होती. तपास यंत्रणांना शंका आहे की, ब्रेझाचा वापर स्फोटापूर्वी लॉजिस्टिक्स सपोर्ट किंवा स्फोटक पदार्थ हस्तांतरित करण्यासाठी करण्यात आला असावा. फरीदाबाद पोलिसांनी विद्यापीठ परिसर तात्पुरता सील केला असून, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

लाल किल्ल्याजवळील स्फोट घडण्यापूर्वी मुख्य आरोपी डॉ. उमर नबीच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. फुटेजमध्ये उमर नबी १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८:०२ वाजता पांढऱ्या हुंडई आय२० कारमधून बदरपूर बॉर्डर टोल प्लाझामधून दिल्लीत प्रवेश करताना दिसत आहे. टोल भरताना मास्क घातलेला उमर वारंवार सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहत होता, ज्यामुळे त्याला सुरक्षा एजन्सीज त्याचा शोध घेत आहेत, याची जाणीव होती. टोल प्लाझावरील फुटेजमध्ये कारच्या मागच्या सीटवर स्फोटके असल्याचा संशय असलेली एक मोठी बॅग स्पष्टपणे दिसत आहे. त्याच दिवशी नंतर, रामलीला मैदानाजवळील एका मशिदीजवळच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही क्लिपमध्ये उमर एका अरुंद गल्लीतून चालताना दिसतो. त्याने तोंड फिरवल्याने त्याचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. 

आतापर्यंत, तपासात चार वाहने आढळून आली. एक मारुती स्विफ्ट आहे, जी डॉ. शाहीन यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. दुसरी पांढऱ्या रंगाची आय२० आहे, ज्याचा वापर स्फोटात करण्यात आला. तिसरी गाडी लाल रंगाची इकोस्पोर्ट आहे, ज्याचा तपास अजूनही सुरू आहे आणि आता ब्रेझा जी अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून जप्त करण्यात आली.

Web Title: Delhi Blast Probe: Fourth Suspect Car, Maruti Brezza, Seized from Al-Falah University Parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.