Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:30 IST2025-11-13T11:28:52+5:302025-11-13T11:30:34+5:30
Delhi Blast Updates: दिल्ली बॉम्बस्फोटातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेली ह्युंदाई आय२० कार गेल्या ११ वर्षांत तब्बल पाच वेळा विकली गेल्याची माहिती तपासात उघड झाली.

Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटामुळे शहरात खळबळ उडाली. लाल किल्ल्याजवळ पार्क केलेल्या एका ह्युंदाई आय२० कारमध्ये हा स्फोट झाला, ज्यामुळे किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेनंतर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली. या भीषण बॉम्बस्फोटातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेली ह्युंदाई आय२० कार गेल्या ११ वर्षांत तब्बल पाच वेळा विकली गेल्याची माहिती तपासात उघड झाली.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. शहराच्या सर्व महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आणि संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमुळे राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
११ वर्षात ५ वेळा विक्री
पहिल्यांदा नदीमने १८ मार्च २०१४ रोजी गुरुग्रामच्या शोरूममधून आय२० कार खरेदी केली. त्यानंतर नदीमने २०१७ मध्ये गुरुग्रामच्या शांती नगर येथील सलमानला कार विकली. सलमानने कारची नोंदणी त्याच्या नावावर केली. मार्च २०२४ मध्ये, सलमानने एक्स्चेंज ऑफर अंतर्गत वापरलेल्या कार ट्रेडिंग एजन्सीद्वारे दिल्लीतील ओखला येथील रहिवासी देवेंद्रला ही कार विकली. परंतु, कार त्याच्या नावावर नोंदणीकृत झाली नाही. काही दिवसांनी देवेंद्रने एक्स्चेंज ऑफर अंतर्गत फरीदाबादच्या सेक्टर ३७ मधील रॉयल कार झोनचे मालक अमित पटेलला ही कार विकली. पुढे अमित पटेलने ओएलक्सवर कार विकायची आहे, अशी जाहिरात दिली.
खरा मालक कोण? शेवटचा व्यवहार कधी झाला?
जाहिरात पाहिल्यानंतर आमिर रशीद आणि आणखी एक व्यक्ती २९ ऑक्टोबर २०२५ रोजी अमित यांच्याकडे आले. त्यांनी ताबडतोब कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आमिरने कारसाठी दिलेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डमध्ये पुलवामा, जम्मू आणि काश्मीर असा पत्ता दिसत होता. कारची विमा तारीख अद्याप बाकी होती. प्रदूषण प्रमाणपत्राची मुदत संपली होती. त्यामुळे त्याने जवळच्या पेट्रोल पंपावर प्रदूषण प्रमाणपत्र बनवून घेतले. त्यानंतर तो गाडी घेऊन निघून गेला. कारचा आरसी त्याच्या नावावर करण्यासाठी त्याला २०-२५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. परंतु, त्यापूर्वीच स्फोट झाला. कार अजूनही सलमानच्या नावावर नोंदणीकृत आहे.