दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:17 IST2025-11-13T19:16:21+5:302025-11-13T19:17:06+5:30
Delhi Blast: डॉ. फारुकने फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली आहे.

दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Delhi Blast: दिल्लीतील भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात व्हाईट कॉलर नेटवर्कचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार डॉक्टरांना ताब्यात घेतले असून, पाचवा डॉक्टरस्फोटात ठार झाला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात आणखी एका डॉक्टराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील जी.एस. मेडिकल कॉलेजमधील प्रसूती विभागातील असिस्टंट प्राध्यापक डॉ. फारुक याला ताब्यात घेतले आहे.
अल-फलाह विद्यापीठाशी लिंक
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. फारुकने हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली होती. तपास यंत्रणांना संशय आहे की, या विद्यापीठातील काही इतर डॉक्टरांप्रमाणेच डॉ. फारुकचेही दहशतवादी संघटनांशी संबंध असू शकतात. हापुडमधून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी दिल्लीला नेले असून, त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आधी चार डॉक्टर अटकेत
यापूर्वी व्हाईट कॉलर नेटवर्कशी संबंधित चार डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. हे नेटवर्क जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद या संघटनांशी संबंधित आहे. या प्रकरणानंतर अल-फलाह विद्यापीठ आणि त्याचा तब्बल 76 एकरांचा परिसर तपासाच्या कचाट्यात आला आहे. या विद्यापीठाची स्थापना 1997 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून झाली होती, तर 2019 मध्ये येथे एमबीबीएस कोर्सेसची सुरुवात झाली.
अटक केलेल्या डॉक्टरांची यादी
आतापर्यंत अटक झालेल्यांमध्ये अल-फलाह विद्यापीठातील डॉ. मुजम्मिल गनई, त्याची मैत्रीण डॉ. शाहीन शाहिद, सहारनपूरमधील फेमस हॉस्पिटलचा डॉ. आदिल अहमद राठर, तसेच डॉ. शाहीनचा भाऊ डॉ. परवेज अन्सारी यांचा समावेश आहे. पोलिस आता या सर्वांचा दिल्ली स्फोटाशी असलेला थेट संबंध शोधत आहेत.
दिल्ली स्फोटात 12 जणांचा मृत्यू
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये झालेल्या भयानक स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. पुलवामाचा रहिवासी आणि अल-फलाह विद्यापीठातील असिस्टंट प्राध्यापक डॉ. मोहम्मद उमर नबी ही स्फोटकांनी भरलेली i20 कार चालवत होता, असा संशय आहे.