दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:33 IST2025-11-16T15:32:14+5:302025-11-16T15:33:21+5:30
दिल्लीतील स्फोट झाल्यापासून तब्बल १२ हून अधिक डॉक्टरांचे मोबाईल फोन नंबर स्विच ऑफ असून ते गायब झाले आहेत. तपास यंत्रणा या सर्व डॉक्टरांचा शोध घेत आहेत.

दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
देशाची राजधानी दिल्लीला हादरवणाऱ्या बॉम्बस्फोटांच्या तपासात तपास यंत्रणांना मोठा आणि धक्कादायक सुगावा लागला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित डॉक्टर मुजम्मिल याच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR)च्या तपासणीतून डॉक्टरांचे एक मोठे आणि संघटित नेटवर्क उघडकीस आले आहे, ज्याचे धागेदोरे थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतीलस्फोट झाल्यापासून तब्बल १२ हून अधिक डॉक्टरांचे मोबाईल फोन नंबर स्विच ऑफ असून ते गायब झाले आहेत. तपास यंत्रणा या सर्व डॉक्टरांचा शोध घेत आहेत.
'अल फलाह' विद्यापीठाशी संबंध
फोन बंद असलेले बहुतांश डॉक्टर हे 'अल फलाह' विद्यापीठाशी संबंधित आहेत. या विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या किंवा तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांची एक मोठी यादी तपास यंत्रणांनी तयार केली आहे.
दहशतवादी विचारधारेचे 'ब्रेनवॉश'
या विद्यापीठातील डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना 'काश्मीर बनेगा दारुल इस्लाम' आणि 'शरीयत या शहादत' अशा घोषणांच्या माध्यमातून 'ब्रेनवॉश' केले जात होते. ही घोषणा अंसार गझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनेची असल्याचे उघड झाले आहे.
मोठा कट उघड
पाकिस्तानमधून सूत्रे हलवणारे हँडलर याच डॉक्टरांच्या माध्यमातून दिल्ली आणि आसपासच्या भागाला हादरवण्याचा मोठा कट रचत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन आणि डॉ. परवेज यांच्या सीडीआरमधूनही तपास यंत्रणांना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. फरार असलेल्या या डझनभर डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.