दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 21:22 IST2025-11-15T21:21:13+5:302025-11-15T21:22:08+5:30
अटक करण्यात आलेली 45 वर्षीय व्यक्ती जम्मू-काश्मीरमधील अनंतनागची रहिवासी असून, डॉ. रईस अहमद भट्ट असे तिचे नाव आहे. डॉ. भट्ट मामून कॅन्टमधील 'व्हाईट मेडिकल कॉलेज'मध्ये तीन वर्षांपासून सर्जन म्हणून कार्यरत आहे.

दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात झालेल्य भीषण स्फोटाच्या कटकारस्थानाचा तपास आता पंजाबमधील पठाणकोटपर्यंत पोहोचला आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या माहितीवरून, पठाणकोटमधील मामून कॅन्ट परिसरातून एका डॉक्टरला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर या कटाचे धागे-दोरे केवळ हरियाणापुरतेच मर्यादित नसून, पंजाबमध्येही पसरल्याचे दिसत आहे.
अटक करण्यात आलेली 45 वर्षीय व्यक्ती जम्मू-काश्मीरमधील अनंतनागची रहिवासी असून, डॉ. रईस अहमद भट्ट असे तिचे नाव आहे. डॉ. भट्ट मामून कॅन्टमधील 'व्हाईट मेडिकल कॉलेज'मध्ये तीन वर्षांपासून सर्जन म्हणून कार्यरत होता.
महत्वाचे म्हणजे, डॉ. रईस अहमद भट्टला कोणत्या तपास यंत्रणेने पकडले, हे अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलिसांनाही याची भनक नव्हती, असे समजते. मात्र, मेडिकल कॉलेजचे व्यवस्थापक स्वर्ण सलारिया यांनी यासंदर्बात पुष्टी केली आहे. डॉ. भट्टला रात्री उशिरा अज्ञात एजन्सीकडून अटक करण्यात आली. तो येथे तीन वर्षांपासून सर्जन म्हणून काम करत होता. तो एमबीबीएस, एमएस, एफएमजी आणि सर्जरीचा प्रोफेसर होता.
अल-फलाह युनिव्हर्सिटी कनेक्शन
डॉ. भट्ट यांचा फरीदाबादमधील 'अल-फलाह युनिव्हर्सिटी'शी थेट संबंध आहे. तो चार वर्षे या युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत होता आणि आताही तेथील अनेक सहकाऱ्यांच्या संपर्कात होता. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे, अटक करण्यात आलेला डॉ. भट्ट दिल्ली स्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर याच्याशीही संपर्क होता.
'डॉक्टर भट्ट'पर्यंत अशी पोहोचली तपास यंत्रणा -
अल-फलाह युनिव्हर्सिटीमधील 'व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्युल'चा तपास करताना, तपास यंत्रणा युनिव्हर्सिटीतील सध्याचे आणि जुने कर्मचारीही तपासत आहे. येथे काम करून गेलेल्या डॉक्टर आणि स्टाफची सविस्तर माहिती, त्यांनी नोकरी सोडण्याची कारणे आणि त्यांच्या संपर्कांचे तपशील गोळा करण्यात आले आहेत. याच डेटावरून तपास पथक पठाणकोटमधील डॉ. रईस अहमद भट्ट पर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली.
सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे, डॉ भट्टला पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अत्यंत संवेदनशील पठाणकोटच्या कॅन्ट भागातून अटक करण्यात आली आहे.