Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:05 IST2025-11-12T13:41:21+5:302025-11-12T14:05:36+5:30
लाल किल्ला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक भयानक तपशील आहेत

Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
नवी दिल्ली - दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याठिकाणी असलेल्या लोकांच्या चिंधड्या उडाल्या. ज्यानेही हे दृश्य पाहिले त्यांच्या अंगाचा थरकाप झालेला दिसून आला. आता त्याहून अधिक भयानक असं या मृतदेहांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक भयानक तपशील आहेत. अनेक मृतदेहांची हाडे तुटली आणि डोक्याला दुखापत झाली. याव्यतिरिक्त काही मृतदेहांमध्ये स्फोटामुळे फुफ्फुसे, कान आणि पोटाला नुकसान झाल्याच्या खुणा दिसून आल्या. स्फोटात मृतांचे कानाचे पडदे, फुफ्फुसे आणि आतडे फुटले, ज्यामुळे स्फोट अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते.
स्फोटानंतर लोक भिंतींवर आणि जमिनीवर आदळले
स्फोटाच्या गंभीर दुखापती आणि जास्त रक्तस्त्राव यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. शिवाय क्रॉस-इंजरी पॅटर्न पाहण्यात आला, जिथे स्फोटाच्या धक्क्याने लोक भिंतींवर आणि जमिनीवर आदळले. शवविच्छेदन अहवालात मृतदेहांवर आणि कपड्यांवर स्प्लिंटर्सचे कोणतेही निशान आढळले नाहीत, परंतु स्फोटात सुधारित स्फोटक पदार्थ वापरला गेला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या स्फोटात कुठले रासायनिक केमिकल वापरले होते याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.. शिवाय बहुतेक मृतदेहांवर जखमा शरीराच्या वरच्या भागात, डोक्यात आणि छातीत केंद्रित होत्या.
दरम्यान, दिल्ली स्फोटात वापरल्या गेलेल्या आय २० कारबद्दल काही अफवा पसरत असल्याचे फरीदाबाद पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ही कार १०-११ दिवसांपासून अल-फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होती. हे खरे नाही. फरीदाबाद पोलीस याची पुष्टी करत नाहीत आणि या अफवेचे पूर्णपणे खंडन करतात असं सांगण्यात येत आहे.
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...
मुजम्मिलने पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत मोठ्या घातपात करण्याचा कट आखला होता. या कटात लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याचा डाव होता. एवढेच नाही तर, आपण सुरुवातीला दिवाळीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचे ठरवले होते, मात्र नंतर, तो प्लॅन पुढे ढकलला आणि २६ जानेवारीला हल्ला करण्याचे ठरवले, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले असं सूत्रांनी म्हटलं.