दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 23:07 IST2025-11-10T23:06:41+5:302025-11-10T23:07:12+5:30
स्फोटात वापरलेली ही कार सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर्ड असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले आहे.

दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कारस्फोटाचा तपास आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. स्फोटात वापरण्यात आलेली Hyundai i20 कार आणि तिच्या मालकाचा शोध हे तपासाचे मुख्य केंद्र बनले आहे. स्फोटात वापरलेली ही कार सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर्ड असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले आहे.
रजिस्टर्ड मालक ताब्यात, पण 'तो' म्हणाला...
स्फोटाच्या ठिकाणी वापरलेल्या कारच्या नोंदी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाई केली आणि रजिस्टर्ड मालक सलमान याला ताब्यात घेतले. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान सलमानने पोलिसांना माहिती दिली की, त्याने ही कार बऱ्याच काळापूर्वी दुसऱ्या व्यक्तीला विकली होती. त्यामुळे स्फोट घडला त्या वेळी ही कार आपल्या ताब्यात नव्हती, असे त्याचे म्हणणे आहे.
स्फोटाच्या सूत्रधाराचा छडा लागणार?
सलमानने दिलेल्या या माहितीमुळे तपासात थोडी गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात सलमान हा शेवटचा रजिस्टर्ड मालक असला तरी, स्फोटाच्या वेळी कार नेमकी कोणाच्या ताब्यात होती आणि तिचा सध्याचा खरा मालक कोण आहे, याचा शोध घेणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरले आहे.
यासाठी आता दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी आरटीओशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आरटीओच्या नोंदींमधून कारची विक्री आणि हस्तांतरण कधी आणि कोणाला झाले, या साखळ्या जोडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या स्फोटामागील मोठे षडयंत्र आणि अस्सल गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी कारच्या सध्याच्या मालकाची अचूक ओळख पटवणे पोलिसांसाठी अत्यावश्यक आहे. यामुळे लवकरच आरटीओच्या अहवालातून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.