दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 19:52 IST2025-11-16T19:51:18+5:302025-11-16T19:52:24+5:30
Delhi Blast: दिल्ली ब्लास्टनंतर पूर्व भारतातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
Delhi Blast:दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाच्या तपासात पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशची भूमिका समोर आली आहे. तपासात असे आढळले आहे की, फरीदाबादमध्ये सापडलेली स्फोटके बांग्लादेशातून मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणले होते. या प्रक्रियेत ‘इख्तियार’ नावाचा संशयित मुख्य भूमिका निभावत होता. आधीच उघड झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या सहभागानंतर, आता पाकिस्तान आणि बांग्लादेशातील दहशतवादी गटांची शंका बळावली आहे.
मुर्शिदाबादमार्गे स्फोटकांची तस्करी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तपास यंत्रणांनी सांगितले की, बांग्लादेशातून तस्करी केलेले स्फोटक मुर्शिदाबाद जिल्ह्याचा ट्रान्झिट रुट म्हणून वापरुन फरीदाबादपर्यंत पोहोचवण्यात आले. ही ‘डिलिव्हरी’ करण्याची जबाबदारी इख्तियार या फरार गुन्हेगाराकडे होती. तो सध्या फरार असून, तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. इख्तियारवर बांग्लादेशातील एका गुप्तहेराच्या हत्येचा हीआरोप आहे.
जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी नेटवर्क सक्रिय
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात लखनौहून पकडलेला शाहीन, फरीदाबादमधून अटक केलेला मुजम्मल, तसेच श्रीनगरहून ताब्यात घेतलेला आदिल, या सर्वांचा संबंध जैश-ए-मोहम्मदशी जोडला गेला आहे. तपासात भारतभरात पसरलेल्या जैशच्या गुप्त नेटवर्कचे ठोस पुरावे मिळत आहेत, मात्र त्याचा संपूर्ण विस्तार अजून स्पष्ट झालेला नाही.
लश्कर-ए-तैयबाशी गुप्त बैठक?
सूत्रांच्या माहितीनुसार, विस्फोटाची घटना घडण्याआधी ढाका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडर सैफुल्लाह सैफ याची भेट घेतली होती. दिल्लीतील स्फोटाची प्राथमिक योजना याच बैठकीत आखण्यात आली. मात्र, तपास यंत्रणा या माहितीला अद्याप ‘प्रमाणित’ मानत नाहीत, कारण बांग्लादेश-पाकिस्तान यांच्यातील सर्व दुव्यांची सखोल तपासणी सुरू आहे.
बंगालमध्ये कडक सुरक्षा
दिल्ली ब्लास्टनंतर पूर्व भारतातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः सियालदह आणि हावडा स्टेशन परिसरात उच्च सतर्कता पातळी लागू करण्यात आली आहे. सियालदह स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार, टॅक्सी, अॅप-कॅबला प्रवेशबंदी आणि सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शिवाय, पार्किंग परिसरात RPF ची सतत गस्त सुरू असून, प्रवाशांच्या सामानाचीही अनेक स्तरांवर तपासणी केली जात आहे.