दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:30 IST2025-11-11T14:28:39+5:302025-11-11T14:30:01+5:30
‘पाच मिनिटे उशीर झाल्याने माझा जीव वाचला.'

दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
Delhi Red Fort Blast Eyewitness: दिल्लीच्या चांदनी चौक परिसरातील भीषण बॉम्बस्फोटानंतर राजधानीत दहशतीचे सावट पसरले आहे. या स्फोटात 9-10 जणांचा मृत्यू झाला असून, 20 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. या स्फोटादरम्यान अनेकांनी मृत्यूला अतिशय जवळून पाहिले, त्यापैकी एकाने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. अवघ्या पाच मिनिटांचा उशीर झाल्याने, त्या तरुणाचा जीव वाचला.
ती लांब रांगच माझ्या आयुष्याची ढाल ठरली...
मनोहर(वय 40) सांगतात की, 10 नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे सुमारे सहा वाजता चांदनी चौकच्या गौरी शंकर मंदिरात गेलो होतो. सोमवारी इतके ट्रॅफिक सहसा नसते, पण लग्नाचा सीझन सुरू असल्याने लाल किल्ल्यापासून यमुना बाजारपर्यंत गाड्या रांग लावून उभ्या होत्या. यू-टर्न घेऊन मंदिराजवळ पोहोचायलाही अर्धा तास गेला. मंदिरात गर्दी खूप होती, पण मी रांगेत दर्शनासाठी उभा राहिलो. तीच लांब रांग माझ्या आयुष्याची ढाल बनली. जर काही मिनिटे आधी दर्शन झाले असते, तर आज माझे नावही मरणाऱ्यांच्या यादीत असते.
त्या व्यक्तीचा काहीच पत्ता नाही...
मनोहर पुढे सांगतात, चांदनी चौकात पार्किंगची नेहमी अडचण असते. पण, माझी एका अपंग व्यक्तीशी ओळख झाली होती, जो मंदिराजवळ गाड्या पार्क करून थोडीफार कमाई करत असे. मी त्याला कधी पैसे, कधी कपडे द्यायचो. कालही मी त्याच्यासाठी एक जीन्स पॅंट घेऊन गेले होते. मी आधी विचार केला की, दर्शन झाल्यावर पँट देईन. मग वाटले, आधीच देऊन टाकतो. कदाचित तो निर्णय देवाचा संकेत होता. ब्लास्टनंतर त्या अपंग व्यक्तीचा काहीच पत्ता लागलेला नाही.
ब्लास्टचा आवाज अन् परिसरात धुराचे लोट
मनोहरच्या आवाजात अजूनही भीती जाणवते. ते सांगतात, मंदिरातून खाली उतरलो आणि क्षणातच एक कान फाडणारा स्फोट झाला. चारही बाजूंनी काळा धूर पसरला. काही दिसत नव्हते, फक्त किंकाळ्या आणि लोकांची धावाधाव सुरू होती. धूर थोडा कमी झाल्यावर पाहिले, माझ्या बाईकजवळ एका माणसाच्या शरीराचा तुकडा पडलेला होता. ते दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. घाबरलेल्या अवस्थेत कशीबशी बाईक सुरू करून घरी निघाले. घरी पोहोचलो, पण हृदय अजूनही थरथरत आहे.
त्या घटनेने मला रात्रभर झोप आली नाही. प्रत्येक वेळी डोळे मिटले की, कानात स्फोटाचा आवाज, धुरामधून उमटणाऱ्या किंकाळ्या आणि जमिनीवर पडलेला तो शरिराचा तुकडा पुन्हा डोळ्यासमोर येतोय. एकच विचार मनात येतोय की, जर मी पाच मिनिटे लवकर गेलो असतो, तर आज मी या जगात नसतो, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी मनोहर यांनी दिली. सुदैवाने मनोहर या घटनेतून वाचले, पण काही लोकांना वाचता आले नाही.