‘मोदी से बैर नही, ... तेरी खैर नही’ उमेदवारी यादी जाहीर होताच दिल्लीमध्ये भाजपात बंडखोरी, या जागांवर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:48 IST2025-01-13T09:47:28+5:302025-01-13T09:48:30+5:30
Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर पक्षामध्ये नाराजी उफाळून आली आहे. रविवारी दिल्ली भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जमून आंदोलन केलं.

‘मोदी से बैर नही, ... तेरी खैर नही’ उमेदवारी यादी जाहीर होताच दिल्लीमध्ये भाजपात बंडखोरी, या जागांवर नाराजी
मागच्या २७ वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाने राज्यात सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दिल्लीमध्ये भाजपाला सत्तेत येण्यासाठी सत्ताधारी आप आणि पारंपरिक विरोधक काँग्रेस अशा दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर पक्षामध्ये नाराजी उफाळून आली आहे. रविवारी दिल्ली भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जमून आंदोलन केलं. दक्षिण दिल्लीतील तुगलकाबाद येथील आंदोलक भाजपाच्या कार्यालयात दाखल झाले. तसेच त्यांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी केली. एवढंच नाही. तर ‘’विक्रम बिधुडी तुम्ही संघर्ष करा…’’, ‘’मोदी से बैर नही, रोहतास तेरी खैर नही’’, अशा घोषणाही दिल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी शनिवादी प्रसिद्ध केली होती. त्यात २९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. या यादीत तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघामधून रोहतास बिधुडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. २०२० मध्ये या मतदारसंघातून भाजपा नेते रमेश बिधुडी यांचे पुतणे विक्रम बिधुडी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा विक्रम विधुडी यांना आम आदमी पक्षाच्या सहीराम यांच्याकडून १३ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे भाजपाने यावेळी उमेदवार बदलून रोहतास बिधुडी यांना उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीमुळे विक्रम बिधुडी यांचे कार्यकर्ते नाराज झाले.
त्याआधी भाजपाची पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पक्षाचे महरोली येथील उमेदवार गजेंद्र यादव यांच्याविरोधात दिल्ली भाजपाच्या कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे आंदोलन केलं होतं. याशिवाय करवालनगर मतदारसंघामधून ५ वेळा निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ आमदार मोहन सिंह बिष्ट यांनीही आपलं तिकीट कापण्यात आल्यानंतर नारादी व्यक्त केली होती. नंतर पक्षाने त्यांना मुस्तफाबाद येथून उनेदवारी जाहीर केली होती. त्यासाठी भाजपाने रविवारी तिसरी यादी जाहीर केली होती. त्यात केवळ मोहन सिंह बिष्ट यांचंच नाव होतं.
दरम्यान, भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, मादीपूर आणि कोंडलीसह विविध मतदारसंघातून उमेदवारी जाहीर न झाल्याने पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये जागांची संख्या मर्यादित आहे. तसेच इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नसेल, ते नाराज होणं स्वाभाविक आहे, असे भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र भाजपा हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. तसेच पक्षाचे नेते ही बाब समजतात. काही काळाने नाराजी व्यक्त करून कार्यकर्ते आणि नेते पक्षाच्या कामाला सुरवात करतील, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला.