"1100 रुपयांसाठी आपलं मत विकू नका..."; अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीतील जनतेला आवाहन, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:35 IST2025-01-24T17:34:27+5:302025-01-24T17:35:43+5:30
केजरीवाल म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यांचा आदर करा. तुम्हाला ज्याला आवडेल त्याला मतदान करा, पण तुमचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मतदान करू नका."

"1100 रुपयांसाठी आपलं मत विकू नका..."; अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीतील जनतेला आवाहन, स्पष्टच बोलले
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले. त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमाना दिल्लीतील जनतेला, बूट, ब्लँकेट, साड्या आणि ११०० रुपयांच्या बदल्यात त्यांची मते विकू नका, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यांचा आदर करा. तुम्हाला ज्याला आवडेल त्याला मतदान करा, पण तुमचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मतदान करू नका."
एवढे पैसे कुठून येत आहेत? -
अरविंद केजरीवाल म्हणाले, "दिल्लीत मते मिळवण्यासाठी साड्या, बूट, ब्लँकेट, जॅकेट... रेशन आणि सोन्याच्या साखळ्या वाटल्या जात आहेत. एवढा पैसा कुठून येत आहे? हा सर्व पैसा भ्रष्टाचारातून आला आहे. त्यांनी देशातील जनतेला लुटून हे पैसे कमावले आहेत. ते जे काही वाटत आहेत ते घ्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे मत विकू नका. चादर, साडी, बूट आणि ११०० रुपयांच्या बदल्यात तुमचे मत विकू नका."
मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करा -
केजरीवाल म्हणाले, मी तुम्हाला विनंती करतो की त्यांच्याकडून शक्य तेवढे पैसे घ्या, पण या लोकांना मतदान करू नका. मतदानाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. संविधान सभेत यावर चर्चा झाली. काही लोक म्हणाले होते, जे अशिक्षित आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मिळू नये. पण बाबासाहेबांनी त्यांना विरोध केला आणि तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. म्हणून मतदानाच्या या अधिकाराचे रक्षण करा.