"निवडणूक जिंकली तर प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा २१०० रुपये", आतिशी यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:59 IST2024-12-18T11:57:53+5:302024-12-18T11:59:46+5:30
Delhi Assembly Election 2025 And Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी १७ डिसेंबर रोजी टिळक नगरमध्ये पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला.

"निवडणूक जिंकली तर प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा २१०० रुपये", आतिशी यांचं आश्वासन
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी १७ डिसेंबर रोजी टिळक नगरमध्ये पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. आतिशी म्हणाल्या की, "देशात फक्त अरविंद केजरीवाल आहेत ज्यांना महिलांच्या वेदना समजल्या आहेत. केजरीवाल नेहमी दिल्लीतील प्रत्येक महिलेला २१०० रुपये दरमहा द्यायचे असल्याचं सांगत असतात. जेणेकरून आपल्या माता-भगिनी सशक्त होऊ शकतील. दिल्लीच्या लोकांना माहित आहे की, केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना गेली १० वर्षे त्यांनी दिल्लीतील सर्वसामान्यांसाठी काम केलं. "
"प्रत्येकजण मोठ्या लोकांना सुविधा देतो, पण दिल्लीच्या इतिहासात जर सामान्य लोकांचा विचार केला असेल तर ती व्यक्ती अरविंद केजरीवाल आहे. आमचं वीजबिल पाच वर्षांपासून शून्यावर आहे. आज दिल्ली हे देशातील एकमेव शहर आहे जिथे २४ तास वीज उपलब्ध आहे. यंदाच्या कडक उन्हातही नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये ८.८ तास वीजपुरवठा खंडित होत असताना दिल्लीत २४ तास वीज मिळत होती."
"दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मोठा बदल झाला आहे. आज सरकारी शाळांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. आज आपल्या सरकारी शाळांमधील मुले JEE-NEET परीक्षा उत्तीर्ण होत आहेत आणि IIT आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेज सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत. हे सर्व अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीमुळे शक्य झाले आहे. आता फेब्रुवारीमध्ये पुन्हा निवडणुका येत आहेत."
" २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये टिळक नगरच्या जनतेने आम आदमी पार्टीला नेहमीच आपलं प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. यावेळीही तुम्ही अरविंद केजरीवाल यांनाच मतदान करा. तुम्ही निवडणूक जिंकून पाठवलं तर दिल्लीतील प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा २१०० रुपये येतील. ही अरविंद केजरीवालांची गॅरंटी आहे. अनेकदा लोक म्हणतात की अरविंद केजरीवाल सर्व काही फक्त महिलांसाठीच का करतात? ते असे करतात कारण महिला अधिक हुशार असतात. केजरीवालांना महिलांच्या वेदना कळतात" असंही आतिशी यांनी म्हटलं आहे.