तीन ठिकाणी मतदान, एफआयआर, उत्पन्न लपवले, केजरीवाल यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 17:01 IST2025-01-18T16:59:10+5:302025-01-18T17:01:51+5:30
Delhi Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच विरोधी पक्षामधील भाजपा आणि काँग्रेस व सत्ताधारी भाजपा यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोपही होत आहेत.

तीन ठिकाणी मतदान, एफआयआर, उत्पन्न लपवले, केजरीवाल यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाचा आक्षेप
विधानसभा निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच विरोधी पक्षामधील भाजपा आणि काँग्रेस व सत्ताधारी भाजपा यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोपही होत आहेत. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाने त्यावर आक्षेप घेत चार सवाल उपस्थित केले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या उमेदवारी अर्जात एफआयआरपासून उत्पन्नापर्यंतच्या अनेक बाबी लपवल्याचा दावा भाजपाने केला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल हे या मतदारसंघामधून २०१३, २०१५ आणि २०२० असे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. आता येथून ते चौथ्यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासमोर भाजपाचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचं आव्हान आहे. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. तर संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.
दरम्यान, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या प्रवेश वर्मा यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात रिटर्निंग ऑफिसर यांच्याकडे आक्षेप नोंदवण्यात आला आहे. प्रवेश वर्मांकडून अरविंद केजरीवाल यांच्या उमेदवारी अर्जाविरोधात चार आक्षेप नोंदवले गेले आहेत . अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात चार एपआयआरची नोंद आहे. मात्र त्यांनी ही माहिली लपवली आहे. अरविंद केजरीवाल यांचं तीन ठिकाणी मतदान आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपलं उत्पन्न लपवलं आहे आणि अरविंद केजरीवाल यांनी ज्या नंबरमधून एनरोल केलं आहे, तो नंबरच अस्तित्वात नाही, असे आक्षेप प्रवेश वर्मा यांच्याकडून नोंदवण्यात आले आहे.
प्रवेश वर्मा यांचे अधिकृत प्रतिनिधी संकेत गुप्ता यांनी केलेल्या दाव्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी जे शपथपत्र दिलं आहे, त्यामध्ये बरीच माहिती लपवण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आपल्या शपथपत्रात जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली आहे. आमच्या आक्षेपांची दखल घेऊन आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.