दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढीलवर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे आम आदमी पक्षाने राज्यातील सर्व ७० विधानसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडूही केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला आव्हान देऊ शकतील अशा उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपाच्या निवडणूक समितीची बैठक याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत मोहोर लागल्यावर भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होऊ शकते.
भाजपाने १९९८ साली दिल्लीतील सत्ता गमावली होती. तेव्हापासून भाजपा राज्यात सत्तेवर येऊ शकलेला नाही. दरम्यान, दिल्लीच्या सत्तेत पुन्हा येण्यासाठी भाजपाकडून मध्य प्रदेश फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपा आपल्या दिल्लीती बड्या नेत्यांना विधासभेच्या रिंगण्यात उतरवू शकतो. त्यामध्ये काही माजी खासदारांचाही समावेश आहे. भाजपाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये ज्या मतदारसंघात पक्षासमोर आव्हान आहे अशा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत असलेला दिल्ली विधानसभा मतदारसंघ, मुख्यमंत्री आतिशी निवडणूक लढवत असलेल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा पहिल्या यादीतून होऊ शकते.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजलीवार यांच्याविरोधात माजी खासदार प्रवेश साहिबसिंह वर्मा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहे. दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनाही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आप आणि काँग्रेसमधून भाजपात आलेले कैलाश गहलोत, राजकुमार गौतम, राजकुमार चौहान, अरविंद सिंह लवली या नेत्यांनाही पहिल्या यादीतून उमेदवारी दिली जाऊ शकते.