मध्यरात्री डॉक्टरांची अर्धनग्न अवस्थेत पार्टी; पोलिसांशी गैरवर्तन, Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:33 IST2025-10-14T12:32:23+5:302025-10-14T12:33:16+5:30
प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे.

मध्यरात्री डॉक्टरांची अर्धनग्न अवस्थेत पार्टी; पोलिसांशी गैरवर्तन, Video व्हायरल...
उत्तराखंडमधील देहरादून शहराती दून रुग्णालयाजवळील पीजी (पदव्युत्तर) डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये मोठा गोंधळ उडाला. शनिवारी रात्री डॉक्टरांची जंगी पार्टी सुरू होती, मोठ्या आवाजात डीजेवर गाणी वाजवली जात होती. या सर्व गोंधळामुळे स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, डॉक्टरांनी पोलिसांशी गैरवर्तन केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं?
दून रुग्णालयाजवळ असलेल्या पीजी डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये शनिवारी रात्री काही विद्यार्थी पार्टी करत होते. या पार्टीत मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती. परिसरातील नागरिकांनी आवाजाची तक्रार पोलिसांना केली. पोलिस पथक जेव्हा ठिकाणी पोहोचले, तेव्हा विद्यार्थी अर्धनग्न अवस्थेत नाचत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना गाणी बंद करण्यास सांगितले असता, विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी उर्मटपणे वर्तन केले.
शिस्तभंगाची कारवाई
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. दून मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. गीता जैन यांनी सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी सुरू असून, महाविद्यालय प्रशासनाने याला गांभीर्यानने घेतले आहे.”आरोग्य सचिव आर. राजेश कुमार यांना घटनेचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्या डॉक्टरच्या खोलीत पार्टी चालू होती, त्याला हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आले असून, त्याच्यावर ₹10,000 दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच इतर सहभागी डॉक्टरांची ओळख पटवून त्यांच्यावरही कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
पोलिसांचा इशारा
शहर कोतवाल प्रदीप पंत यांनी सांगितले की, पोलिस मोठ्या आवाजाच्या तक्रारीवरुन कारवाईसाठी गेले होते. तिथे काही डॉक्टरांनी पोलिसांशी उर्मटपणा केला. मात्र पोलिसांनी त्यांना कठोर चेतावणी देऊन सोडले आणि भविष्यात अशी घटना पुन्हा न घडवण्याची सूचना केली. सध्या या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, डॉक्टरांच्या वर्तनावर संताप व्यक्त होत आहे. ही घटना केवळ शिस्तीचा प्रश्न नाही, तर समाजात डॉक्टरांच्या प्रतिमेलाही धक्का देणारी आहे.