ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. जवानांची भेट घेत त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा देत म्हटलं की, "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. हा फक्त ट्रेलर आहे. योग्य वेळ आल्यावर जगाला पूर्ण चित्रपट दाखवू." संरक्षणमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचं खूप कौतुक केलं आहे.
"आपल्या हवाई दलाची पोहोच ही पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत आहे, ही काही छोटी गोष्ट नाही, हे आता पूर्णपणे सिद्ध झालं आहे. आज परिस्थिती अशी आहे की, भारताची लढाऊ विमानं हे सीमा ओलांडल्याशिवाय येथून देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात मारा करण्यास सक्षम आहेत. संपूर्ण जगाने पाहिलं आहे की, तुम्ही पाकिस्तानी भूमीवरील नऊ दहशतवादी अड्डे कसे उद्ध्वस्त केले."
"लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्या वेळात तुम्ही शत्रूंना संपवलं"
"ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुम्ही जे काही केलं त्यामुळे सर्व भारतीयांना अभिमान वाटला आहे, मग ते भारतात असोत किंवा परदेशात. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त २३ मिनिटं पुरेशी होती. लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्या वेळात तुम्ही तुमच्या शत्रूंना संपवलं" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
"पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून मारलं आणि आम्ही दहशतवाद्यांना, पाकिस्तानला त्यांचं कर्म पाहून अद्दल घडवली. मी जगाला विचारू इच्छितो की, अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान शहीद झालेल्या आपल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो" असं केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.