Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:28 IST2025-05-15T13:18:52+5:302025-05-15T13:28:25+5:30

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याचं राजनाथ सिंह यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

Operation Sindoor jammu kashmir defence minister Rajnath Singh india pakistan tension loc security review army cheif | Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"

Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"

पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरला पोहोचले आहेत. त्यांनी जवानांची भेट घेतली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि १० मे रोजी दोन्ही देशांमधील युद्धविरामानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. 

ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याचं राजनाथ सिंह यांनी भरभरून कौतुक केलं आहे. "पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून मारलं आणि आम्ही दहशतवाद्यांना, पाकिस्तानला त्यांचं कर्म पाहून अद्दल घडवली. मी जगाला विचारू इच्छितो की, अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान शहीद झालेल्या आपल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो" असं केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. 

"जवानांच्या धाडसालाही सलाम"

"मी आपल्या जखमी जवानांच्या धाडसालाही सलाम करतो आणि ते लवकर बरे व्हावेत अशी देवाकडे प्रार्थना करतो. शत्रूला नेस्तनाबूत केलं ती ऊर्जा अनुभवायला मी इथे आलो आहे. तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्या परकारे उद्ध्वस्त केलं ते शत्रू कधीही विसरणार नाही. तुम्ही पाहिलं असेल की, लोक सहसा उत्साहात आपलं भान गमावतात परंतु तुम्ही तुमचा उत्साह तसाच कायम ठेवला आणि अचूक पद्धतीने शत्रूची ठिकाणं उद्ध्वस्त केली."

"आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

"आज भारताचा दहशतवादाविरुद्धचा संकल्प किती मजबूत आहे हे आपण त्यांच्या न्यूक्लियर ब्लॅकमेलची पर्वा केलेली नाही यावरून समजलं. संपूर्ण जगाने पाहिलं आहे की पाकिस्तानने किती बेजबाबदारपणे भारताला अनेक वेळा धमकी दिली आहे" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांशी संवाद साधला. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिल्याचं मोदींनी म्हटलं आहे.  

पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या योद्ध्यांना मोदींनी संबोधित केलं. "ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 


 

Web Title: Operation Sindoor jammu kashmir defence minister Rajnath Singh india pakistan tension loc security review army cheif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.