सैन्य माघारीचा कालावधी ठरवा; भारताने चीनला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 06:22 AM2020-07-26T06:22:41+5:302020-07-26T06:22:57+5:30

चिनी अ‍ॅपवर बंदी, थेट परकीय गुंतवणुकीत बदल करून भारताने चीनच्या नाड्या आवळल्या आहेत. हे केवळ तात्पुरते उपाय नसून भविष्यात याचे आर्थिक परिणाम दिसण्याची भिती आता चीन अभ्यासकांनी व्यक्त केल्याने ड्रॅगनचा सूर नरमला.

Decide the duration of the military withdrawal; India asks china | सैन्य माघारीचा कालावधी ठरवा; भारताने चीनला खडसावले

सैन्य माघारीचा कालावधी ठरवा; भारताने चीनला खडसावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवरून सैन्य माघारीसाठी केवळ चर्चा नव्हे तर दिवस निश्चित करा, असे भारताने चीनला खडसावले आहे. एकीकडे चर्चा करायची व दुसरीकडे सैन्याची जमवाजमव ही ड्रॅगनची कुटिल नीती राजनैतिक चर्चेदरम्यान भारताने उघडकीस आणली.


चिनी अ‍ॅपवर बंदी, थेट परकीय गुंतवणुकीत बदल करून भारताने चीनच्या नाड्या आवळल्या आहेत. हे केवळ तात्पुरते उपाय नसून भविष्यात याचे आर्थिक परिणाम दिसण्याची भिती आता चीन अभ्यासकांनी व्यक्त केल्याने ड्रॅगनचा सूर नरमला. तब्बल सहा तास झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी पूर्णपणे सैन्य माघारीची तयारी दर्शवली. वर्किंग मेकेनिझम फॉर कन्सल्टेशन अँड को आॅर्डीनेशनची सोळावी बैठक पार पडली.
तत्पूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दिवसभर चर्चा झाली होती. त्यात ठरल्याप्रमाणे चीनने शब्द पाळावा, असे भारताने सुनावले.


बैठकीत संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. पंधरा जूनला झालेल्या हिंसक झटापटीनंतर सीमेवर शांतता राखण्यास दोन्ही देशांनी सहकार्य केल्याचा सूर बैठकीत उमटला. मात्र सीमावादाचे परिणाम आर्थिक तसेच राजनैतिक स्तरावर होवू न देण्याचे रडणागे चिनी अधिकाऱ्यांनी गायले. त्यावर जोपर्यंत शेवटच्या सैनिकाला माघारी बोलावण्याचा दिवस निश्चित करून त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आर्थिक संबंधांवर चर्चाही न करण्याचा खमकेपणा भारताने दाखवला. भारताने गेल्या सत्तर वर्षांच्या राजनैतिक संबंधांमध्ये पहिल्यांदाच अशी कठोर भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.


इंडोनेशिया-भारताची जवळीक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इस्त्रायलचे संरक्षण मंत्री जनरल बेंजामिन गँत्झ यांच्याशी संवाद साधला. इस्त्रायलकडून लष्करी इंटेलिजंन्स देवाणघेवाणीवर त्यात चर्चा झाली. विशेष म्हणजे इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री पारबो सबॅन्टो सोमवारी (२६ जुलै) भारत दौºयावर येत आहेत. दक्षिण चीन समुद्रात आता इंडोनेशियाने चीनविरोधात शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे इंडोनेशिया-भारताची जवळीक वाढली आहे.
चिनी निर्यातीवर अवलंबून असलेल्या भारतीय उद्योगांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, मात्र चीनला धडा शिकवण्याचा हाच मार्ग असल्याचेही सूत्रांनी नमूद केले. दक्षिण चीन समुद्रात आॅस्ट्रेलिया, जपान व अमेरिकेसोबत हवाई युद्धनौकांचा अभ्यास व अत्याधुनिक शस्रास्रांची खरेदी केल्याने भारताने चीनलाही समज दिली.

Web Title: Decide the duration of the military withdrawal; India asks china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.