केरळ काँग्रेस नेत्याच्या राहुल गांधींवरील टीकेने वाद
By Admin | Updated: May 30, 2014 02:44 IST2014-05-30T02:44:33+5:302014-05-30T02:44:33+5:30
केरळमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री टी.एच. मुस्तफा यांच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे निर्माण झालेला वाद चिघळला आहे

केरळ काँग्रेस नेत्याच्या राहुल गांधींवरील टीकेने वाद
तिरुवनंतपुरम/नवी दिल्ली : केरळमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री टी.एच. मुस्तफा यांच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे निर्माण झालेला वाद चिघळला आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी मुस्तफा यांच्या टिप्पणीची निर्भर्त्सना केली आणि पराभवाला केवळ राहुल गांधी यांना जबाबदार धरले जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी स्वत: पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा द्यायला हवा. त्यांची तशी इच्छा नसल्यास पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी. ते संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान विदुषकाप्रमाणे वागत होते, असे वादग्रस्त विधान मुस्तफा यांनी केले होते. कोची येथे बुधवारी माजी मंत्री मुस्तफा यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. मुस्तफा यांच्या टिप्पणीवर तिरुवनंतपुरममध्ये काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. राज्यात पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवास राहुल यांना जबाबदार धरणार्या मुस्तफा यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केरळ राज्य युवक काँग्रेसने केल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि घटक पक्ष यूडीएफने केरळमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावली आणि राज्यात २० पैकी १२ जागांवर विजय मिळवला. परंतु पक्षाला इडुक्की आणि चलाक्कुडीसारख्या गडात एलडीएफकडून पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी मुस्तफा यांच्या टिप्पणीवर असहमती दर्शविली. (वृत्तसंस्था)