मुली कायम मुली, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा; वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेस फ्लॅट सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:14 AM2021-09-22T10:14:23+5:302021-09-22T10:16:48+5:30

९० वर्षांचे विनोद दलाल व ८९ वर्षे वयाच्या त्यांच्या पत्नी जुहू रोड मुंबई येथे फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपला स्वत:चा राहता फ्लॅट मुलींना भेट म्हणून देऊन टाकला. मुलगा आशिष व त्याच्या पत्नीला हे आवडले नाही व त्यांनी फ्लॅट बळकाविण्यासाठी वृद्ध आई- वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली.

Daughters forever daughters, sons only until marriage; SC Order to son and son-in-law who harassing the elderly parents leave the flat | मुली कायम मुली, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा; वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेस फ्लॅट सोडण्याचे आदेश

मुली कायम मुली, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा; वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेस फ्लॅट सोडण्याचे आदेश

googlenewsNext

डॉ. खुशालचंद बाहेती -

मुंबई
: ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे मुले आणि नातेवाईकांवर वृद्धांना कोणत्याही त्रासाविना सामान्य जीवन जगण्यासाठी असणाऱ्या गरजा पुरविण्याची जबाबदारी आहे. हा कायदा करण्यामागचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आई, वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा व सुनेला घर सोडण्याचा आदेश दिला.

९० वर्षांचे विनोद दलाल व ८९ वर्षे वयाच्या त्यांच्या पत्नी जुहू रोड मुंबई येथे फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपला स्वत:चा राहता फ्लॅट मुलींना भेट म्हणून देऊन टाकला. मुलगा आशिष व त्याच्या पत्नीला हे आवडले नाही व त्यांनी फ्लॅट बळकाविण्यासाठी वृद्ध आई- वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आशिषकडे स्वत:चा फ्लॅट व इतर मालमत्ता आहे. मुलगा व सुनेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ज्येष्ठ नागरिक संरक्षण प्राधिकरणाकडे अर्ज करून त्यांना घरातून काढून टाकण्याची मागणी केली. प्राधिकरणाने अर्ज मान्य करत मुलास कुटुंबासह फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले.

याविरुद्ध मुलाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. अपिलात फ्लॅट मुलींना भेट दिला असल्याने आई वडिलांचा यावर हक्क राहिलेला नाही म्हणून प्राधिकरणाच्या आदेशावर आक्षेप घेतला. हे फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने यात आई-वडिलांचा हक्क मान्य केला, असहाय वृद्ध आई-वडील आयुष्याच्या शेवटच्या काळात शांततेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या किमान अपेक्षाही सधन मुलाकडून पूर्ण होऊ नयेत काय? हे दु:खद आहे. वृद्ध आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या घरात राहणे हेच त्रास देणे आहे. यामुळे त्यांच्या सामान्य जीवन जगण्याच्या अधिकारांवर गदा येते, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने सून व मुलास फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले.

न्यायालयाचे मत
- या कायद्याची अंमलबजावणी करताना न्यायालये संकुचित किंवा पाण्डित्याची भूमिका घेऊ शकत नाहीत.
- सामान्य जीवन जगणे याचा अर्थ व्यापक आहे. त्याचा संबंध ज्येष्ठ नागरिकांसाठी घटनेच्या खंड २१ मधील मुलभूत अधिकाराशी आहे.
- या कायद्यात मालमत्ता म्हणजे चल, अचल, वडिलोपार्जित किंवा स्वत: मिळवलेली, मूर्त किंवा अमूर्त या सर्वांचा समावेश होतो.
फ्लॅट भेटीत मिळूनही मुलींना आई-वडिलांनी शेवटपर्यंत त्यात राहण्यास हरकत नाही. याउलट मुलगा व सून तो बळकावण्यासाठी त्रास देत आहेत. हे पाहून मुली शेवटपर्यंत मुलीच असतात. मुलगा मात्र लग्न होईपर्यंत मुलगा असतो या म्हणण्यात तथ्य असावे. अर्थात याला अपवाद आहेतच. 
-न्या. जी. एस. कुलकर्णी
 

Web Title: Daughters forever daughters, sons only until marriage; SC Order to son and son-in-law who harassing the elderly parents leave the flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.