पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:55 IST2025-05-01T05:55:38+5:302025-05-01T05:55:54+5:30
जातनिहाय नोंदणीच्या निर्णयानंतर होणार आणखी एक महत्त्वाचे पाऊल

पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
नवी दिल्ली : जातनिहाय नोंदणीच्या निर्णयानंतर पुढील जनगणनेची तारीख लवकरच होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. कोरोना साथीच्या काळात जातनिहाय जनगणना करायची की नाही यावर निर्णय न झाल्याने ती सर्व प्रक्रिया रखडली.
जातनिहायगणनादेखील दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेसोबतच करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ही प्रक्रिया भारताचे नोंदणी रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्तांच्या देखरेखीखाली होईल. ते या जनगणनेचा अहवाल गृह मंत्रालयाला अहवाल देतील. मात्र पुढील जनगणना कधी होईल हे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले नाही.
अशी असेल भारताची पहिली डिजिटल जनगणना
पुढील जनगणना भारताची पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. त्यात नागरिकांना स्वयंनोंदणी करण्याची संधी दिली जाईल. यासाठी एक पोर्टलची निर्मिती झाली असली तरी ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. स्वयंनोंदणीसाठी आधार किंवा मोबाइल क्रमांक आवश्यक असणार आहे.
हे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार
डिजिटल माध्यमातून जनगणनेसाठी होणाऱ्या स्वयंनोंदणीत सुमारे ३६ प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत. त्यात घरात टेलिफोन, इंटरनेट, मोबाइल, सायकल, दुचाकी, कार आहे का, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालयाची उपलब्धता, अंघोळीसाठी व्यवस्था, स्वयंपाक घर आहे का, इंधन कोणते वापरतात, टीव्ही-रेडिओ आहे का, घराचा बांधकाम प्रकार व स्थिती, घरमालक महिला आहे का, अशा मुद्द्यांचा समावेश असणार आहे.