‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:16 IST2025-10-29T16:15:43+5:302025-10-29T16:16:15+5:30
Data News: केंद्र सरकारच्या हजारो कर्मचाऱ्यांचा डेटा चीनकडे गेला आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये चिनी चिप असल्याने भारतामधील गल्लीबोळाची माहिती चीनकडे आहे, असा सनसनाटी दावा एचसीएलचे सहसंस्थापक अजय चौधरी यांनी केला आहे.

‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा
केंद्र सरकारच्या हजारो कर्मचाऱ्यांचा डेटा चीनकडे गेला आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये चिनी चिप असल्याने भारतामधील गल्लीबोळाची माहिती चीनकडे आहे, असा सनसनाटी दावा एचसीएलचे सहसंस्थापक अजय चौधरी यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘सध्या तुम्ही तुमच्या आसपास जेवढी उपकरणे पाहत आहात. त्यामध्ये लावण्यात आलेली चीप ही चिनी आहे. जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये हजेरीसाठी मशीन बसवण्याची घोषणा केली होती. तसेच त्यांच्या आदेशानुसार बसवण्यात आलेल्या या सर्व मशीन चिनी होत्या. त्यात चायनिज चीप लागलेली होती. त्यानंतर दोन वर्षांनी जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अजय चौधरी यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले. याबाबत तपास करण्यात आला तेव्हा सर्व महत्त्वाचा डेटा चीनमध्ये गेला असल्याची माहिती समोर आली. सध्या देशातील सारे सीसीटीव्ही, सगळे गल्लीबोळ चीनला माहिती झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे या प्रत्येक सीसीटीव्हीमध्ये चिनी चिप फिट करण्यात आलेली आहे.
आज आपल्याकडे एकही भारतीय फोन नाही आहे. ही खूपच वाईट बाब आहे, असेही ते म्हणाले. यावर आता भारतामध्ये फोन तयार केले जात आहेत, असे सांगितले असता फोनची जोडणी करणं ही नॉनसेन्स बाब असल्याचा टोला लगावला. हे सर्व स्क्रू-ड्रायव्हर तंत्रज्ञान आहे. जेव्हा कुठलाही अॅपल फोन किंवा सॅमसंग फोन भारतामध्ये तयार केला जातो, तेव्हा त्याची किट चीनमधून येते, येथे केवळ स्क्रू लावून जोडणी केली जाते आणि पाठवले जातात, असेही अजय चौधरी म्हणाले.
यावेळी स्वदेशी भारतीय टेक उत्पादनांना जागतिक बनवण्यासाठी भारत सरकारची काय भूमिका असली पाहिजे, असं विचारलं असता चौधरी म्हणाले की, सरकारने त्यांची असलेली सगळी मागणी भारतीय कंपन्यांना दिली पाहिजे. चीनचा सारा व्यवसाय हुआवेला देण्यात आला आहे. या कंपनीला चिनी सरकारने क्रेडिट लिमिट दिलेली आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या भारतामध्ये कुठली कंपनी असं करू शकते, असं विचारलं असता त्यांनी कुठलीही कंपनी असं करू शकत नाही असे सांगितले.