उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथील दिहूली येथे झालेल्या २४ दलितांच्या हत्याकांडाप्रकरणी कोर्टाने तब्बल ४४ वर्षांनंतर निकाल सुनावला आहे. कोर्टाने या प्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर एकाला फरार घोषित केले आहे. या प्रकरणातील एकू १७ आरोपींपैकी १३ आरोपींचा आधीच मृत्यू झाला आहे.
१९८१ मध्ये उत्तर प्रदेशमधील फिरोझाबादजवळील दिहुली येथे दरोडेखोरांच्या टोळीने एका गावावर हल्ला केला होता. तसेच दलित व्यक्तींवर बेछूट गोळीबार करून २४ जणांची हत्या केली होती. तर इतर अनेक जण जशमी झाले होते.या घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले होते. तसेच उत्तर प्रदेशपासून केंद्रापर्यंतच्या सरकारांना हादरे बसले होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिहुली गावाचा दौरा करून पीडितांची भेट घेतली होती. तेव्हा या हत्याकांडावरून विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांना धारेवर धरलं होतं. तसेच विरोधी पक्षांचे नेते बाबू जगजीवनराम यांनीही या गावाचा दौरा केला होता.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार दिहुली हा गावा फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना तालुक्यात आहे. येथे डाकू संतोष आणि राधे यांच्या टोळीने १८ नोव्हेंबर १९८१ रोजी दलितांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. जवळपास ४४ वर्षांपासून या घटनेतील पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज कोर्टाने या प्रकरणात तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र या प्रकरणातील एकूण १७ आरोपींपैकी १३ आरोपींचा आधीच मृत्यू झालेला आहे. तर एक जण फरार आहे.