"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:15 IST2025-05-04T12:11:09+5:302025-05-04T12:15:38+5:30
पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्याची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप करत सीआरपीएफने जवानाला बडतर्फ केले आहे.

"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
CRPF Jawan Munir Ahmed: पहलगाम हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश जारी केले. दुसरीकडे, सीआरपीएफ जवान मुनीर अहमदची पाकिस्तानी पत्नी मीनल खान हिचे प्रकरण सध्या चर्चेत आहे, जी तिचा व्हिसा संपल्यानंतरही भारतात राहत होती. पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याबद्दल सीआरपीएफ मुनीर अहमदला सुरक्षा दलाने बडतर्फ केले आहे. मुनीर अहमदने पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्याची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप सीआरपीएफने केला आहे. मात्र जवानाने आपण विवाह करण्यासाठ परवानगी घेतली होती असं म्हटलं.
केंद्रीय राखीव पोलीस दलातील कॉन्स्टेबल मुनीर अहमदविरुद्ध कारवाई कठोर कारवाई करण्यात आली. औपचारिक मान्यता नसतानाही मुनीर अहमदने पाकिस्तानी महिलेशी विवाह केला. त्यानंतर सीआरपीएफने मुनीर अहमदला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत सेवेतून बडतर्फ केले. मुनीरवर पाकिस्तानी महिलेसोबतचे विवाह केल्याचे लपवून ठेवल्याची आरोप करण्यात आला आहे. मात्र मुनीर अहमदने हे आरोप फेटाळून लावले असून आपण विभागाकडून परवानगी घेऊन विवाह केल्याचे म्हटलं. तसेच कारवाईविरोधात कोर्टात जाणार असल्याचे अहमदने सांगितले.
सीआरपीएफ जवान मुनीर खानचा अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिक मीनल खानशी विवाह झाला होता. त्यानंतर ती व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि नंतर तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला. पण तिच्या व्हिसाची मुदत २२ मार्च २०२५ रोजी संपली आणि तरीही ती भारतात राहत होती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत घेण्यात आली होती. ज्या दिवशी ती अटारी-वाघा सीमेवर होती त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात तिच्या याचिकेवर सुनावणी पार पाडली. कोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतर तिला सीमेवरून परत पाठवण्यात आले होते.
मात्र सीआरपीएफने मुनीर अहमदवर कारवाई करत त्याला बडतर्फ केले. "सुरुवातीला मला माझ्या बडतर्फीची बातमी माध्यमांद्वारे मिळाली. काही वेळानंतर मला सीआरपीएफकडून माझ्या बडतर्फीची माहिती देणारे पत्र मिळाले. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी धक्का आहे. कारण लग्नापूर्वी मी माझ्या मुख्यालयातून पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्याची परवानगी मागितली होती, तेव्हा मला परवानगी मिळाली होती," असे मुनीर अहमदने सांगितले. मुनीर म्हणाला की मला हा निर्णय मान्य नाही आणि या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाणार आहे.
"मी पहिल्यांदा ३१ डिसेंबर २०२२ रोजी मुख्यालयाला पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्याची माझी इच्छा कळवण्यासाठी एक पत्र लिहिले. यामध्ये मला पासपोर्ट, लग्नपत्रिका आणि शपथपत्राची प्रत दाखवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, मी माझे प्रतिज्ञापत्र आणि माझे पालक, सरपंच आणि जिल्हा विकास परिषद सदस्य यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि अखेर ३० एप्रिल २०२४ रोजी मुख्यालयाकडून मला मंजुरी मिळाली. जेव्हा मी मुख्यालयातून एनओसी मागितली तेव्हा मला सांगण्यात आले की अशी कोणतीही तरतूद नाही. मी परदेशी नागरिकाशी लग्न करण्यासाठी आवश्यक असलेल्या औपचारिकता आधीच पूर्ण केल्या आहेत," असेही मुनीर अहमदने सांगितले.
"गेल्या वर्षी २४ मे रोजी आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाइन लग्न केले. यानंतर, मी माझ्या ७२ व्या बटालियनला विवाहाचे फोटो, निकाह कागदपत्रे आणि लग्नाचे प्रमाणपत्र सादर केले. २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा ती पहिल्यांदा १५ दिवसांच्या व्हिसावर भारतात आली तेव्हा आम्ही मार्चमध्येच दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता आणि त्यासाठी मुलाखतीसारख्या सर्व आवश्यकता पूर्ण झाल्या होत्या. त्याच दरम्यान ही घटना घडली" असं मुनीर अहमद म्हणाला.