प्रेमासाठी काय पण! फेसबुकवर सूत जुळलं, लग्न करण्यासाठी 'ती' थेट श्रीलंकेहून आली भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 15:48 IST2023-07-30T15:46:37+5:302023-07-30T15:48:07+5:30
शिवकुमारी विघ्नेश्वरी ही 25 वर्षीय श्रीलंकन महिला तिचा फेसबुक फ्रेंड लक्ष्मणसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली.

फोटो - news18 hindi
सीमा हैदरपासून अंजूपर्यंत आणि पोलंडपासून झारखंडपर्यंतच्या बरबरापर्यंत सर्वांनीच प्रेमासाठी देशाच्या 'सीमा' ओलांडल्या आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. शिवकुमारी विघ्नेश्वरी ही 25 वर्षीय श्रीलंकन महिला तिचा फेसबुक फ्रेंड लक्ष्मणसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली.
TOI नुसार, महिलेने आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी लक्ष्मणशी लग्न केले आहे. ही महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. शनिवारी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची बातमी व्हायरल होताच पोलिसांनी तिला 15 ऑगस्टला व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी देश सोडण्याचे किंवा एक्सटेन्शनचे निर्देश दिले आहेत.
लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विघ्नेश्वरी 8 जुलै रोजी आंध्र प्रदेशात गेली. 20 जुलै रोजी चित्तूर जिल्ह्यातील व्ही कोटा येथील एका मंदिरात या जोडप्याचे लग्न झाले. व्ही कोटा मंडळाच्या अरिमकुलापल्ले येथील लक्ष्मणची 2017 मध्ये फेसबुकवर श्रीलंकेतील विघ्नेश्वरीची ओळख झाली. विघ्नेश्वरी 8 जुलैला कोलंबोहून टुरिस्ट व्हिसावर चेन्नईला पोहोचली. लक्ष्मण तिला घेण्यासाठी चेन्नईला गेला. लक्ष्मणच्या कुटुंबीयांच्या संमतीने 20 जुलै रोजी तिचे लग्न झाले.
चित्तूर जिल्हा पोलिसांनी या जोडप्याला त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिल्याने या जोडप्याचा आनंद अल्पकाळ टिकला. चित्तूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) वाय रिशांत रेड्डी यांनी विघ्नेश्वरीला नोटीस बजावली कारण तिचा व्हिसा 15 ऑगस्ट रोजी संपणार आहे. तिला श्रीलंकेला परतावे लागेल, अशी सूचना पोलिसांनी केली.