Crime: पोलीस गस्तीवर असतानाच दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी लुटली बँक, रिकामी केली तिजोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 22:42 IST2023-06-02T22:42:37+5:302023-06-02T22:42:58+5:30
Bihar Crime News: जिल्हा मुख्यालयापासून केवळ दोन किमी अंतरावर असलेल्या बंधन बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा घालून दिवसाढवळ्या बँकेची तिजोरी रिकामी केली. त्यानंतर शस्त्रांचा धाक दाखवत हे दरोडेखोर फरार झाले.

Crime: पोलीस गस्तीवर असतानाच दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी लुटली बँक, रिकामी केली तिजोरी
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा नंगानाच घातला आहे. सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सीतामढी जिल्ह्यात दहशतीचं वातावरण आहे. तसेच गुन्हेगारांवर जरब बसवणं पोलिसांना कठीण बनलं आहे. याचदरम्यान, सीतामढीच्या जिल्हा मुख्यालयापासून केवळ दोन किमी अंतरावर असलेल्या बंधन बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा घालून दिवसाढवळ्या बँकेची तिजोरी रिकामी केली. त्यानंतर शस्त्रांचा धाक दाखवत हे दरोडेखोर फरार झाले.
बंधन बँकेमधून सुमारे १० लाख रुपये लुटण्यात आले आहेत. चार ते पाच दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत हा दरोडा घातला. ही घटना मुख्यालयापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर घडली. या दरोड्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. आहे. पोलिसांच्या गस्तीच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरोड्यानंतर घटनास्थळी सीतामढीचे एसपी मनोज कुमार तिवारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. दरोड्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच अधिक पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे.
बँकेत प्रवेश केल्यानंतर या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बंधक बनवले. त्यानंतर काऊंटरमध्ये ठेवलेले सुमारे १० लाख रुपये लुटून नेले. दरोड्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसपी मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले की, या दरोड्यात जे कुणी सहभागी असतील त्यांना सोडलं जाणार नाही. दरोड्याचा पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. या दरोड्यात सुमारे १० लाख रुपये लुटण्यात आले आहेत.