Crime: चंद्रग्रहणाच्या दिवशी नॉनव्हेज बनवलं; जमावाकडून कुटुंबाला घरात घुसून मारहाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:38 IST2025-09-08T12:33:21+5:302025-09-08T12:38:22+5:30
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील लिंगराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वर टांगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली.

Crime: चंद्रग्रहणाच्या दिवशी नॉनव्हेज बनवलं; जमावाकडून कुटुंबाला घरात घुसून मारहाण!
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील लिंगराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वर टांगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. चंद्रग्रहणाच्या दिवशी मांसाहारी जेवण बनवल्याबद्दल जमावाने एका कुटुंबाला घरात घुसून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच लिंगराज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात घबराट पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांनी चंद्रग्रहणाला वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोनातून पाहिले आणि दररोजप्रमाणे घरात मांसाहारी जेवण बनवले. परंतु, काही जणांना ते खटकले. दरम्यान, १० ते १५ जणांनी पीडित कुटुंबाच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी घरातील पुरुषांना दांडक्याने मारहाण केली आणि महिलांचेही कपडे फाडले, असे सांगण्यात आले. घाबरून शेजारचे लोकही त्यांच्या मदतीला आले नाहीत. या घटनेने परिसरात घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच लिंगराज पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले होते आणि घराचे बरेच नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.