अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:41 IST2025-11-15T18:40:39+5:302025-11-15T18:41:38+5:30
दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात फरीदाबादची अल फलाह युनिव्हर्सिटी देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे.

अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
दिल्लीस्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आता या युनिव्हर्सिटीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक आणि धोकाधडी आरोपाखाली दोन एफआयआर दाखल केले आहेत. तसेच, युनिव्हर्सिटीला नोटीस पाठवून संबंधित कागदपत्रेही मागवण्यात आली आहेत.
दिल्लीस्फोट प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात फरीदाबादची अल फलाह युनिव्हर्सिटी देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. स्फोटाचा सूत्रधार मानला जाणारा डॉ. मुजम्मिल याच्या अटकेनंतर तपास यंत्रणा कटाचे थर उलगडत आहेत. याच दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने युनिव्हर्सिटीवर कारवाईचा फास आवळला आहे. क्राईम ब्रांचने अल फलाह युनिव्हर्सिटीविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत.
पोलिसांनी ही कारवाई युजीसीच्या तक्रारीवरून केली आहे. क्राईम ब्रांचने युनिव्हर्सिटीविरुद्ध एक एफआयआर फसवणुकीच्या कलमांखाली आणि दुसरा एफआयआर धोकाधडीच्या कलमांखाली दाखल केला आहे. पोलिसांनी अल फलाह युनिव्हर्सिटीला नोटीस पाठवली आहे आणि काही आवश्यक कागदपत्रेही मागवली आहेत.
युनिव्हर्सिटीचे २ डॉक्टर आणि ३ लोक ताब्यात
या कारवाईव्यतिरिक्त, दिल्ली पोलिसांनी युनिव्हर्सिटीच्या २ डॉक्टरांसह एकूण ३ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे डॉक्टर स्फोट घडवणाऱ्या कारचा चालक डॉ. उमर नबी याच्या ओळखीचे होते. ही धरपकड शुक्रवारी रात्री हरियाणातील धौज, नूंह आणि आसपासच्या भागात केलेल्या छापेमारीदरम्यान झाली.
मुजम्मिलचा मोहम्मद आणि मुस्तकीमशी संबंध
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या टीमच्या मदतीने स्पेशल सेलने नूंह येथून अल फलाह युनिव्हर्सिटीचे दोन डॉक्टर मोहम्मद आणि मुस्तकीम यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही दहशतवादी मॉड्यूलच्या तपासाखाली अटक केलेल्या डॉ. मुजम्मिलच्या संपर्कात होते. तसेच ते डॉ. उमर नबीचे जवळचे मित्र होते.
प्राथमिक चौकशीत असे उघड झाले आहे की, या दोघांपैकी एक स्फोटाच्या दिवशी दिल्लीत होता. तो एम्समध्ये एका मुलाखतीसाठी दिल्लीला आला होता. डॉ. गनई याच्याशी त्यांचे संबंध किती जवळचे होते हे जाणून घेण्यासाठी दोघांची कसून चौकशी केली जात आहे.