नवी दिल्ली - उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक मंगळवारी होणार आहे. या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतील. संसदेत सध्याचे संख्याबळ आणि राजकीय पक्षांची भूमिका यातून एक दिवस आधीच निकालाचे संकेत मिळत आहेत. संख्याबळाचं बोलायचं झाले तर सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या बाजूने सध्यातरी फार संख्याबळ दिसत नाही.
क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसदेचे सदस्य गुप्त मतदान करणार आहेत. शिवाय यासाठी कुठलाही व्हिप जारी करण्याची तरतूद नाही. याचा अर्थ खासदार ज्याला वाटेल त्याला मर्जीने मतदान करू शकतात. परंतु सामान्यपणे खासदार त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिकांचे समर्थन करून मतदान करत असतात. त्यामुळे अशा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंतिम निकालाचा तंतोतंत अंदाज लावणे कठीण आहे. त्यातच एनडीए असेल वा इंडिया आघाडी यांच्या घटक पक्षात वेगवेगळे स्टँड घेतलेले दिसून येतात. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.
जिंकण्यासाठी ३८६ खासदारांची गरज
सध्या लोकसभेत ५४२ तर राज्यसभेत २३९ खासदार आहेत, म्हणजे एकूण ७८१ खासदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ३९१ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यातच निवडणुकीच्या एक दिवस आधी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बीजेडी आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने मतदानापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या खासदारांची संख्या ७७० इतकी झाली आहे. त्याचा अर्थ विजयी उमेदवाराला जिंकण्यासाठी ३८६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
सीपी राधाकृष्णन यांचं पारडं जड
सत्ताधारी पक्ष म्हणजेच एनडीएचे दोन्ही सभागृहात एकूण ४२५ खासदार आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षानेही एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. वायएसआर काँग्रेसचे संसदेत ११ खासदार आहेत. याचा अर्थ एनडीएच्या समर्थनात ४३६ मते येऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा विजय आकडेवारीत निश्चित दिसत आहे.
१० खासदारांचं तळ्यात मळ्यात
संसदेतील १० खासदार कोणत्या बाजूने झुकतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय लोकसभेत सात अपक्ष खासदार आहेत, ते कोणत्या बाजूने झुकतील हे स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांची भूमिका काय असेल हे पाहणे बाकी आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित मारहाणीमुळे त्यांनी स्वतःला पक्षापासून दूर केले आहे. त्यांच्या भाजपामध्ये प्रवेशाच्या अफवाही येत असतात. त्याचप्रमाणे अकाली दल आणि मिझोरामच्या झेडपीएमबद्दल अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. त्यांचे प्रत्येकी एक खासदार आहे.
विरोधकांचा मार्ग खूप कठीण
निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या मतांचा विचार केला तर कागदावर हा आकडा ३२४ च्या पुढे जात नाही. म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या ४३६ आणि विरोधी पक्षाच्या ३२४ मध्ये ११२ मतांचा मोठा फरक आहे. जरी अकाली दल, झेडपीएम आणि स्वाती मालीवाल या सात अपक्षांची मते सुदर्शन यांच्या बाजूने पडली तरी ते जादूच्या आकड्यापेक्षा खूप मागे राहू शकतात. ही सर्व मत एकाच बाजूला जातील हे सांगणे खूप कठीण आहे. आता क्रॉस व्होटिंगवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातही एनडीएला फक्त राज्यसभेतील राधाकृष्णन यांच्या बाजूने १५० खासदारांचे क्रॉस-व्होटिंग अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता सध्या तरी फार दूर वाटत आहे.