सत्ताधारी एनडीएचे बहुमत असताना इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार दिला होता. यामुळे मतदान होणार हे नक्की झाले होते. दोन्ही बाजुंनी आपल्याकडे मतदान होण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी झाली होती. काही पक्षांनी मतदानापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. हा आकडा जास्त नसला तरी क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. इंडिया आघाडीला क्रॉसव्होटिंग होईल असे दावे केले जात होते. परंतू उलटेच घडले आहे.
एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएच्या एकूण संख्याबळापेक्षा १४ मते जास्त पडली आहेत. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली तर बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली आहेत. विजयासाठी 392 मतांची गरज होती. यापेक्षा कितीतरी जास्त मते राधाकृष्णन यांना मिळाली आहेत. अशातच १४ खासदारांनी क्रॉस व्होटींग केल्याने इंडिया आघाडीला चांगलाच सुरुंग लागला आहे.
निवडणुकीत ७६७ खासदारांनी मतदान केले. त्यापैकी १५ मते अवैध ठरली होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ११ मते अवैध ठरली होती. या निवडणुकीत १३ खासदारांनी मतदान केले नाही. मतदान न करणाऱ्यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि अपक्ष १ अशा खासदारांचा समावेश आहे.