सव्वा लाखाच्या शेणाची चोरी; सरकारी कर्मचाऱ्याला घडली तुरुंगवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 13:17 IST2019-02-06T13:12:18+5:302019-02-06T13:17:41+5:30
एका चोराने चक्क शेणाची चोरी केल्याची घटना घडली आहे. चिकमंगळुरूमधील एका सरकारी कर्मचाऱ्याने तब्बल सव्वा लाखाच्या गायीच्या शेणाची चोरी केली आहे.

सव्वा लाखाच्या शेणाची चोरी; सरकारी कर्मचाऱ्याला घडली तुरुंगवारी
चिकमंगळुरू - दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. मात्र एका चोराने चक्क शेणाची चोरी केल्याची घटना घडली आहे. चिकमंगळुरूमधील एका सरकारी कर्मचाऱ्याने तब्बल सव्वा लाखाच्या गायीच्या शेणाची चोरी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकमंगळुरू जिल्ह्यातील बिरूर येथे ही घटना घडली. पशुपालन विभागाच्या संचालकांनी शेण चोरीला गेल्याची तक्रार बिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. स्थानिक पशुपालन विभागाच्या अमृतमहल स्टॉकमधून अचानक 35-40 किलो शेण नाहीसे झाल्यामुळे याबाबत तक्रार केली.
पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता शेण अमृतमहलच्याच एका सरकारी कर्मचाऱ्यानेच चोरल्याची बाब समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्याने चोरलेले सर्व शेण मित्राच्या शेतावर लपवून ठेवले होते. या शेणाचा वापर प्रामुख्याने शेतातील खतासाठी होतो. तेव्हा हे शेण विकून पैसे कमवण्याचा कर्मचाऱ्याचा विचार होता. चोरीला गेलेले शेण जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.