हनिमूनसाठी शिलाँगला गेलेलं जोडपं बेपत्ता, बेवारस स्थितीत सापडली दुचाकी, त्यांच्यासोबत नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:24 IST2025-05-27T17:24:23+5:302025-05-27T17:24:56+5:30
Crime News: लग्नानंतर ईशान्य भारतातील शिलाँग येथे गेलेलं इंदूर येथील नवविवाहित जोडपं अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हनिमूनसाठी शिलाँगला गेलेलं जोडपं बेपत्ता, बेवारस स्थितीत सापडली दुचाकी, त्यांच्यासोबत नेमकं घडलं काय?
लग्नानंतर ईशान्य भारतातील शिलाँग येथे गेलेलं इंदूर येथील नवविवाहित जोडपं अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ११ मे रोजी विवाहबद्ध झालेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी २० मे रोजी हे शिलाँग येथे हनिमून साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांचं शेवटचं लोकेशन शिलाँगमधील संवेदनशील भाग असलेल्या ओसरा हिल येथे दिसले. तिथे त्यांनी भाड्याने घेतलेली दुचाकी बेवारस स्थिती सापडली आहे. आता स्थानिक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
इंदूरमध्ये वाहतुकीचा व्यवसास करणारे राजा रघुवंशी यांचं ११ मे रोजी धुमधडाक्यात लग्न झालं होतं. त्यानंतर नवदाम्पत्य २० मे रोजी हनिमूनसाठी इंदूरहून बंगळुरू आणि तिथून पुढे गुवाहाटीला गेलं होतं. गुवाटाटीमध्ये कामाख्या मातेचं दर्शन घेतल्यावर ते २३ मे रोजी शिलाँगला पोहोचले होते. शिलाँगला गेल्यावरही ते कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र २३ मे नंतर त्यांच्याशी असलेला कुटुंबीयांचा संपर्क तुटला होता.
राजा यांचा थोरला भाऊ सचिन रघुवंशी याला वाटलं की, कदाचित नेटवर्कची समस्या असल्याने फोन लागत नसेल. मात्र २४ मे रोजी दोघांचेही फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. कुठलाच संपर्क होत नसल्याने सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ बिपिन विमानाने तातडीने शिलाँगला पोहोचले. गोविंद याने गुगल मॅप आणि त्यांच्या फोटोंच्या माध्यमातून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना भाड्याने दुचाकी देणाऱ्या एजन्सीचा पत्ता सापडला. या जोडप्याने आपल्याकडून दुचाकी भाड्याने घेतल्याची आणि तिथून ओसरा हिलच्या दिशेने गेल्याची माहिती दिली.
त्यानंतर या जोडप्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा या जोडप्याने भाड्याने नेलेली दुचाकी तिथे बेवारस स्थिती दिसून आली. या भागाग ओरसा नावाचा एक रिसॉर्टही आहे. हा रिसॉर्ट गुन्हेगारांचा अड्डा मानला जातो. राजा रघुवंशी यांचा भाऊ सचिन रघुवंशी याने सांगितले की, भाषेच्या समस्येमुळे स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात अडचणी येत आहेत. त्यानंतर पोलीस आयुक्त संतोष सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी प्रकरणाचं गांभीर्य विचारात घेऊन डीसीपी क्राईम ब्रँच राजेश कुमार त्रिपाठी यांच्याकडे तपास सोपवला आहे. ते शिलाँग पोलिसांसोबत सातत्याने संपर्कात आहेत.