किरकोळ वादातून दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; दिवाळीच्या दिवशीच चार मुले झाली अनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 17:38 IST2025-10-22T17:37:40+5:302025-10-22T17:38:11+5:30
मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले.

किरकोळ वादातून दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; दिवाळीच्या दिवशीच चार मुले झाली अनाथ
UP News: सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, अशा आनंदाच्या वातावरणात उत्तर प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून त्रस्त झालेल्या एका दांपत्याने आत्महत्या केली. यामुळे चार लहान मुलांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचे छत्र हरवले. या घटनेने केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवाबगंज परिसरातील कानी बगिया मोहल्ल्यात राहणारे राकेश (वय 32 वर्षे) आणि त्यांची पत्नी रेखा (वय 27 वर्षे) यांच्यात सोमवारी दुपारी कौटुंबिक वाद झाला. या वादानंतर संतप्त रेखाने घराच्या छतावरील हुकाला साडीचा फास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रेखाचे वडील संतराम आणि भाऊ माधव तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
मंगळवारी सकाळी रेखाचा अंत्यसंस्कार सुरू होता, त्याच वेळी रेखाचा पती राकेश यानेही त्याच पद्धतीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. आई-वडिलांच्या आत्महत्येमुळे सौरभ (12 वर्षे), विवेक (10 वर्षे), विजय (8 वर्षे) आणि ओम (1.5 वर्षे) अशा चार मुले अनाथ झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठा मुलगा सौरभ म्हणाला की, “पप्पा आणि मम्मीमध्ये नेहमी भांडण व्हायचे. त्यामुळे मम्मीने फाशी घेतली. त्यानंतर मामा आणि नानाने पप्पाला मारले, त्यामुळे त्यांनीही फाशी घेतली.” मुलांच्या म्हणण्यानुसार, दागिन्यांवरुन वाद झाला होता. मृत महिलेच्या माहेरच्यांनी काही दागिने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, याच कारणाने परिस्थिती अधिक बिघडली.
पोलिसांनी सांगितले की, मृत राकेशच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कायदेशीर तपास सुरू केला असून, सर्व बाजूंनी प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मुलांना सध्या नातेवाईकांच्या देखरेखीखाली ठेवले आहे.