चिंताजनक! कोरोनामुळे तब्बल 40 कोटी भारतीय लोटले जाणार गरिबीच्या खाईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 13:50 IST2020-04-09T13:03:48+5:302020-04-09T13:50:51+5:30
लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश व्यवहार उद्योगधंदे हे बंद आहेत. त्यामुळे त्याचा रोजगार आणि रोजंदारीवर विपरीत परिणाम झाला आहे.

चिंताजनक! कोरोनामुळे तब्बल 40 कोटी भारतीय लोटले जाणार गरिबीच्या खाईत
नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे संक्रमण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश व्यवहार उद्योगधंदे हे बंद आहेत. त्यामुळे त्याचा रोजगार आणि रोजंदारीवर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या संकटामुळे भारतातील असंघटित क्षेत्रात काम करणारे सुमारे 40 कोटी लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील अशी, भीती संयुक्त राष्ट्रांच्या कामगार विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीमुळे जगभरात सुमारे 19.5 कोटी लोकांच्या कायमस्वरूपी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) आपल्या 'आयएलओ निरीक्षण - दुसरी आवृत्ती कोविड-19 आणि जागतिक कामकाज' मध्ये सध्याची परिस्थिती ही दुसऱ्या महायुद्धानंतर ओढवलेले सर्वात मोठे संकट असल्याचे म्हटले आहे. आयएलओचे महासंचालक गाय रायडर यांनी सांगितले की, 'विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये कामगार आणि व्यावसायिकांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याला वेगाने, एकत्र आणि निर्णायक पावले उचलावी लागतील.'
'जगभरातील सुमारे दोन अब्ज लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. यापैकी अनेक जण उगवत्या आणि विकासशील अर्थव्यवस्थामध्ये आहेत. हे एक गंभीर संकट आहे. कोविड-19 संकटाच्या आधीच असंघटित क्षेत्रातील लाखो कामगार प्रभावित झाले आहेत. आयएलओने सांगितले की भारत, नायजेरिया आणि ब्राझील या देशामध्ये लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजनांमुळे असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.' असे या अहवालात म्हटले आहे.
'भारतात अनौपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्यांची भागीदारी सुमारे 90 टक्के आहे. यामध्ये सुमारे 40 कोटी कामगारांसमोर गरिबीच्या खाईत लोटले जाण्याचे संकट आहे.'अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामगार वर्ग मोठया प्रभावित झाला असून, यापैकी बहुतांश जणांना गावाकडे स्थलांतर करणे भाग पडले आहे.