coronavirus: सिप्लाने बनविले कोरोनावरील जगभरातले सर्वात स्वस्त जेनेरिक औषध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:20 IST2020-07-10T05:38:37+5:302020-07-10T07:20:51+5:30
आता महिनाभरात या औषधाच्या ८० हजार कुप्या तयार करण्यात येतील.

coronavirus: सिप्लाने बनविले कोरोनावरील जगभरातले सर्वात स्वस्त जेनेरिक औषध
बंगळुरू : कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापरण्यात येणाऱ्या रेमडिसिव्हिर औषधाची सिप्रेमी ही जेनेरिक आवृत्ती सिप्ला इंडिया या कंपनीने तयार केली आहे. या औषधाच्या १०० मिलिग्रॅमच्या कुपीची किंमत चार हजार रुपये (५३.३४ डॉलर) इतकी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना आजारावर जगभरात देण्यात येणाºया औषधांमध्ये हे सिप्रेमी हे सर्वात स्वस्त किमतीचे औषध ठरले आहे. त्याद्वारे सिप्ला इंडियाने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांवरही मात केली आहे.
सिप्ला इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष निखिल चोप्रा यांनी सांगितले की, सिप्रेमी हे औषध उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता महिनाभरात या औषधाच्या ८० हजार कुप्या तयार करण्यात येतील. आम्ही कोरोनावर तयार करत असलेल्या जेनेरिक औषधाची किंमत ५ हजारांपेक्षा अधिक असणार नाही, असे सिप्ला इंडियाने याआधी जाहीर केले होते. सिप्लासाठी हे जेनेरिक औषध बनविणारे व पॅकेजिंग करणाºया सॉव्हरिन फार्मा या कंपनीने सिप्रेमी औषधाची पहिली बॅच उत्पादित करून रवाना केली आहे. हे औषध सध्या सरकारमार्फत तसेच रुग्णालयांतूनच उपलब्ध होईल.
किंमत ८०० रुपयांनी कमी
सिप्रेमी औषधाची पहिली बॅच १० हजार कुप्यांची आहे. युरोपातील मायलॅन या कंपनीनेही रेमडिसिव्हिर औषधाची जेनेरिक आवृत्ती तयार केली असून, त्यापेक्षा सिप्लाच्या सिप्रेमी औषधाची किंमत ८०० रुपयांनी कमी आहे. हितेरो लॅब्ज लिमिटेड या कंपनीने रेमडिसिव्हिरच्या बनविलेल्या जेनेरिक आवृत्तीची किंमत ५४००, तर मायलॅनने बनविलेल्या जेनेरिक औषधाची किंमत ४,८०० रुपये इतकी आहे.