CoronaVirus News: अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका कायम; विविध करांच्या वसुलीत आतापर्यंत ३१ टक्क्यांची घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:59 IST2020-06-17T01:17:57+5:302020-06-17T06:59:04+5:30
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (१५ जूनपर्यंत) प्रत्यक्ष करांचा महसूल ३१ टक्क्यांनी कमी झाला असून, तो १ लाख ३७ हजार ८२५ कोटी रुपये इतका झाला आहे.

CoronaVirus News: अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका कायम; विविध करांच्या वसुलीत आतापर्यंत ३१ टक्क्यांची घट
मुंबई : कोरोनाच्या संकटानंतर देशातील एकूण कर महसुलात १५ जूनपर्यंत मोठी घट झाली असून, यंदा ३१ टक्क्यांनी कर महसूल कमी जमा झाला असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. विविध कंपन्यांकडून भरण्यात येणाऱ्या आगाऊ करामध्ये (अॅडव्हान्स टॅक्स) मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने कर महसूल कमी प्रमाणात जमा झाला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (१५ जूनपर्यंत) प्रत्यक्ष करांचा महसूल ३१ टक्क्यांनी कमी झाला असून, तो १ लाख ३७ हजार ८२५ कोटी रुपये इतका झाला आहे. जून २०१९ या तिमाहीमध्ये देशातून एक लाख ९९ हजार ७५५ कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष करांचा महसूल जमा झाला होता, अशी माहिती प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जून महिना अखेर संपणाºया पहिल्या तिमाहीतील दोन महिने हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये संपले. या काळात देशातील सुमारे ८० टक्के आर्थिक उलाढाली बंद राहिल्या होत्या. त्यामुळे या काळात उलाढाल बंद असल्याचा परिणाम कराचा महसूल कमी होण्यामध्ये झाला आहे.
१ जूनपासून सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असली तरी अद्याप आर्थिक घडामोडी फारशा सुरू झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था अद्यापही रांगत असल्याचे दिसत असल्याने कर भरण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या तिमाहीचा आगाऊ कर भरण्यासाठी १५ जून ही शेवटची मुदत असते.
कंपन्यांच्या करामध्येही मोठी घट
विविध घटकांनी आपले उत्पन्न लक्षात घेऊन एकदम कर न भरता तो टप्प्याटप्प्याने भरल्यास सुविधा मिळते. हे लक्षात घेऊन प्राप्तिकर खात्यातर्फे आगाऊ कर (अॅडव्हान्स टॅक्स) भरण्याची सवलत दिली जात असते. विविध कंपन्या तसेच उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती या सवलतीचा लाभ घेत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे कंपन्यांकडून भरण्यात येणाºया आगाऊ कराच्या रकमेमध्ये ७९ टक्के एवढी मोठी घट झाली आहे. यामुळे कर महसूल जमा होण्यात अडचण निर्माण झाली आहे.