Coronavirus Updates: देशात गेल्या २४ तासांत ५३ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ८८ दिवसांतील कमी संख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 05:57 IST2021-06-22T05:57:32+5:302021-06-22T05:57:59+5:30
नव्या रुग्णांमध्ये रविवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी २६ हजार ३५६ ने घट झाली.

Coronavirus Updates: देशात गेल्या २४ तासांत ५३ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ८८ दिवसांतील कमी संख्या
नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ५३ हजार नवे रुग्ण सापडले असून ते मागील ८८ दिवसांतील सर्वात कमी प्रमाण आहे. १,४२२ जण या संसर्गाने मरण पावले असून तो गेल्या ६५ दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. सक्रिय रुग्ण व मृत्यूंमध्ये आणखी घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २ कोटी ९९ लाख ३५ हजार २२१ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ८८ लाख ४४ हजार १९९ जण बरे झाले. नव्या रुग्णांमध्ये रविवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी २६ हजार ३५६ ने घट झाली. या आजाराने आजवर ३ लाख ८८ हजार १३५ जण मरण पावले आहेत. ७ लाख २ हजार ८८७ जणांवर उपचार सुरू आहेत व त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत २.३५ टक्के आहे. कोरोनाबाधितांपैकी ९६.३६ टक्के लोक बरे झाले.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३९ कोटी २४ लाख ७ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तसेच कोरोना लसीचे २८ कोटी ३६ हजार ८९८ डोस नागरिकांना देण्यात आले. दररोजचा व एका आठवड्याचा संसर्ग दर अनुक्रमे ३.८३ टक्के व ३.३२ टक्के आहे. दोन्ही संसर्गदर गेल्या काही दिवसांपासून ५ टक्क्यांच्या खाली आहेत.