coronavirus : कोरोनाविरोधात केंद्र सरकारने केलेल्या उपययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केले मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:32 IST2020-03-23T17:29:51+5:302020-03-23T17:32:14+5:30
कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे.

coronavirus : कोरोनाविरोधात केंद्र सरकारने केलेल्या उपययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केले मोठे विधान
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या देशात होत असलेल्या फैलावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि विविध राज्यातील सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्व अत्यावश्यक पावले उचलली आहेत, असे संपूर्ण देशाचे मत आहे. एकंदरीत सरकार चांगले काम करत आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कोविड-19 विषाणूची तपासणी करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे वर्ग केली आहे.
दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राने केलेल्या तयारीबाबत सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांवर आम्ही समाधानी आहोत. सरकारचे टीकाकारदेखील सरकारकडून योग्य काम करत असल्याचे मान्य केले जात आहे. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती एल. एन. राव आणि सूर्यकांत यांचाही समावेश होता.
दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.