Coronavirus: रशियन बनावटीच्या ‘स्पुतनिक व्ही’लसीचा दुसरा साठा भारतात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 07:15 IST2021-05-17T07:15:25+5:302021-05-17T07:15:52+5:30
‘स्पुतनिक व्ही’ लसीच्या ६० हजार मात्रा घेऊन आलेले विमान रविवारी हैदराबाद विमानतळावर दाखल झाले.

Coronavirus: रशियन बनावटीच्या ‘स्पुतनिक व्ही’लसीचा दुसरा साठा भारतात दाखल
हैदराबाद : ‘स्पुतनिक व्ही’ या रशियन बनावटीच्या लसीचा दुसरा साठा रविवारी भारतात दाखल झाला. या खेपेला लसीच्या ६० हजार मात्रा आणण्यात आल्या आहेत. १ मे रोजी ‘स्पुतनिक’च्या दीड लाख मात्रा देशात आल्या होत्या.
‘स्पुतनिक व्ही’ लसीच्या ६० हजार मात्रा घेऊन आलेले विमान रविवारी हैदराबाद विमानतळावर दाखल झाले. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे हे प्रतीक असून लसीची ही दुसरी खेप अगदी वेळेवर देशात दाखल होत आहे, असे रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव्ह यांनी नमूद केले. लवकरच लसीचे भारतातील उत्पादन वाढीस लागेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी ‘स्पुतनिक’च्या उत्पादनासंदर्भात करार झाला असून पुढील वर्षापर्यंत पुरेशा लसी भारतात उपलब्ध असतील.